Land Rover Defender वर मिळतेय तब्बल 34 लाख रुपयांची सूट, घेण्यासाठी ग्राहकांची तुफान गर्दी
Land Rover Defender खरेदी करणाऱ्यांसाठी आंनदाची बातमी. या कारवर मिळते तब्बल 34 लाख रुपयांची सूट. घेण्यासाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी. इतकी सूट का?

लक्झरी SUV खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जॅग्वार लँड रोव्हरने (JLR) पुण्यातील प्लांटमध्ये Land Rover Defender 110 ची स्थानिक असेंब्ली सुरू केली आहे. त्यामुळे या लोकप्रिय SUV च्या काही व्हेरिएंटच्या किंमतीत तब्बल 34 लाख रुपयांपर्यंत कपात झाली आहे. विशेष म्हणजे, किंमत कमी होण्यासोबतच अनेक महागडी फीचर्स आता स्टँडर्ड स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
आता किती आहे Defender 110 ची किंमत?
दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील एक्स-शोरूम किंमती पुढीलप्रमाणे आहेत.
Defender 110 X-Dynamic HSE 3.0-लिटर पेट्रोल आणि डिझेल: पूर्वी 1.52 कोटी रुपये, आता 1.18 कोटी रुपये. म्हणजेच तब्बल 34 लाख रुपयांची कपात.
Defender 110 X-Dynamic HSE 2.0-लिटर टर्बो-पेट्रोल: पूर्वी 1.13 कोटी रुपये, आता 99 लाख रुपये. म्हणजेच 14 लाख रुपयांची बचत.
कंपनीच्या माहितीनुसार, या SUV चे ऑनलाइन आणि ऑफलाइन बुकिंग करता येणार असून, डिलिव्हरी 15 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.
2.0 -लिटर मॉडेलमध्ये मिळणार अधिक फीचर्स
स्थानिक पातळीवर असेंबल होणाऱ्या 2.0 -लिटर टर्बो-पेट्रोल व्हेरिएंटमध्ये पूर्वी अतिरिक्त पैसे देऊन घ्यावी लागणारी अनेक फीचर्स आता स्टँडर्ड मिळतील. यामध्ये अॅडॅप्टिव्ह ऑफ-रोड क्रूझ कंट्रोल, एअर सस्पेन्शन, एअर प्युरिफायर, थ्री-झोन क्लायमेट कंट्रोल आणि इंटिरिअर रिअर-व्ह्यू मिरर यांचा समावेश आहे.
याशिवाय, हेडलॅम्प वॉशर, तिसऱ्या रांगेतील मॅन्युअल सीट्स, फ्रंट सेंटर कन्सोलमधील रेफ्रिजरेटर आणि हीटिंग, कूलिंग व मेमरी फंक्शन असलेल्या 14-वे इलेक्ट्रिक फ्रंट सीट्सही मिळतील. या अतिरिक्त सुविधांची किंमत सुमारे 6.5 लाख रुपयांपर्यंत असल्याचे सांगितले आहे.
3.0 -लिटर मॉडेलमध्येही मोठी सुविधा
3.0-लिटर पेट्रोल आणि डिझेल व्हेरिएंटमध्येही सुमारे 17 लाख रुपयांपर्यंत किमतीची अतिरिक्त फीचर्स स्टँडर्ड करण्यात आली आहेत. यामध्ये 20-इंच अलॉय व्हील्स, इलेक्ट्रॉनिक अॅक्टिव्ह डिफरेंशियल, हीटेड थर्ड-रो सीट्स, मेरिडियन सराउंड साउंड सिस्टीम आणि हेड-अप डिस्प्ले यांसारख्या सुविधांचा समावेश आहे.
एकंदरीत, स्थानिक असेंब्लीमुळे Defender 110 ची किंमत कमी होण्यासोबतच अधिक फीचर्स मिळत असल्याने लक्झरी SUV खरेदीदारांसाठी हा महत्त्वाचा बदल ठरू शकतो. मात्र, येथे नमूद केलेल्या किंमती एक्स-शोरूम आहेत; प्रत्यक्ष ऑन-रोड किंमत कर, विमा आणि इतर शुल्कांनुसार वेगळी असेल.