टाटा पंचला टक्कर देणार मारुतीची नवीन SUV, मायलेज आणि फीचर्स पाहून सर्व थक्क
टाटा पंचला टक्कर देण्यासाठी मारुती आणणार नवी मायक्रो SUV. 190mm ग्राउंड क्लिअरन्ससह मिळणार CNG इंजिन. 2027 मध्ये होणार लॉन्च. फीचर्स पाहून व्हाल थक्क.

भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी लवकरच भारतीय बाजारपेठेत एक नवीन मायक्रो SUV आणण्याच्या तयारीत आहे. कंपनीची ही आगामी कार थेट टाटा पंच आणि ह्युंदाई एक्स्टरला टक्कर देणार आहे. सध्या या कारला Maruti Y43 असे कोडनेम देण्यात आले आहे. जपानमधील Kei कारपासून प्रेरित असलेले या कारचे डिझाइन बॉक्सी आणि चौकोनी असण्याची शक्यता आहे. ही कार 2027 मध्ये भारतीय बाजारपेठेत दाखल होऊ शकते.
मारुती सुझुकीने यापूर्वी इग्निसच्या माध्यमातून मायक्रो SUV सेगमेंटमध्ये प्रवेश केला होता. मात्र, अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने कंपनीने 2026 च्या सुरुवातीला इग्निसचे उत्पादन बंद केले. आता Maruti Y43 च्या माध्यमातून कंपनी या सेगमेंटमध्ये नव्याने दमदार पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे.
रिपोर्ट्सनुसार, हरियाणातील खरखोडा येथील नवीन प्लांटमध्ये या कारची टेस्टिंग सुरू असल्याचे दिसून आले आहे. या कारमध्ये चौकोनी बॉडी, उंच स्टान्स आणि फ्लॅट बोनट डिझाइन मिळण्याची शक्यता आहे. भारतीय रस्त्यांचा विचार करून यात जवळपास 190mm ग्राउंड क्लिअरन्स आणि 16-इंच अलॉय व्हील्स दिले जाऊ शकतात.
सनरूफसह मिळणार अनेक प्रीमियम फीचर्स
फीचर्सच्या बाबतीतही Maruti Y43 खास असू शकते. या मायक्रो SUV मध्ये सनरूफ, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, वायरलेस स्मार्टफोन चार्जर, फास्ट USB टाइप-C चार्जिंग पोर्ट्स, क्रूझ कंट्रोल आणि ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल यांसारखी फीचर्स मिळण्याची शक्यता आहे.
सुरक्षेसाठी यात 6 एअरबॅग्स, 360-डिग्री कॅमेरा आणि LED फ्रंट फॉग लॅम्प्स दिले जाऊ शकतात. मात्र, कंपनीने अद्याप या फीचर्सची अधिकृत पुष्टी केलेली नाही.
टाटा पंच आणि ह्युंदाई एक्स्टरला देणार टक्कर
भारतीय बाजारपेठेत टाटा पंचने मायक्रो SUV सेगमेंटमध्ये मोठे यश मिळवले आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये लॉन्च झाल्यापासून या कारने 8 लाखांहून अधिक युनिट्सच्या विक्रीचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे मारुती सुझुकी आता या सेगमेंटमध्ये आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे.
किफायतशीर किंमत, चांगले मायलेज, आधुनिक फीचर्स आणि मारुतीचे मोठे सर्व्हिस नेटवर्क यामुळे Maruti Y43 ग्राहकांसाठी आकर्षक पर्याय ठरू शकते. विशेषतः कमी बजेटमध्ये SUV सारखा लूक आणि जास्त मायलेज देणारी कार शोधणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी ही कार महत्त्वाची ठरू शकते.