मुंबई विमानतळ अखेर अदानी समूहाच्या ताब्यात, देशातील 4 विमानतळांवर नियंत्रण

| Updated on: Jul 14, 2021 | 9:53 AM

Mumbai Airport | आता देशातील चार प्रमुख विमानतळांचा कारभार अदानी समूहाच्या हातात गेला आहे. यापूर्वी लखनऊ, मंगळुरू आणि अहमदाबाद विमानतळाचे नियंत्रण अदानी समूहाच्या हातात आले होते.

मुंबई विमानतळ अखेर अदानी समूहाच्या ताब्यात, देशातील 4 विमानतळांवर नियंत्रण
अदानी समूह
Follow us on

मुंबई: गौतम अदानी यांच्या मालकीच्या अदानी समूहाने अखेर मुंबई विमानतळाचा कारभार हातात घेतला आहे. गौतम अदानी यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली. मुंबई विमानतळाची शान आणखी वाढवणे हे आमचे आश्वासन आहे आणि ते आम्ही यशस्वीरित्या पूर्ण करु, असे अदानी यांनी ट्विटमध्ये म्हटले. या माध्यमातून देशभरात मोठ्याप्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल, असा दावाही गौतम अदानी यांनी केला.

अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडच्या मंगळवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबतच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. मुंबई विमानतळ व्यवस्थापनामध्ये अदानी समूहाचा 74 टक्के हिस्सा असेल. जीव्हीके समूहाकडे असलेला 50.5 टक्के हिस्सा या समूहाने यापूर्वीच संपूर्णपणे मिळविला असून, आणखी 23.5 टक्के हिस्सा हा एअरपोर्ट कंपनी साऊथ आफ्रिका (एसीएसए) आणि बिडवेस्ट समूह या अन्य अल्पसंख्य भागीदारांकडून खरेदी केला जाईल, असे या संबंधीच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

आता देशातील चार प्रमुख विमानतळांचा कारभार अदानी समूहाच्या हातात गेला आहे. यापूर्वी लखनऊ, मंगळुरू आणि अहमदाबाद विमानतळाचे नियंत्रण अदानी समूहाच्या हातात आले होते. त्यानंतर आता मुंबई हे अदानी समूहाच्या अखत्यारित असलेले चौथे विमानतळ आहे. यानंतर जयपूर, गुवाहाटी, तिरुवनंतपुरम ही विमानतळेही अदानी समूहाच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यातच ही प्रक्रिया पूर्ण होईल, असे बोलले जात आहे.

ही सर्व विमानतळे पुढील 50 वर्षे अदानी समूहाच्या ताब्यात असतील. या काळात या विमानतळांचा विकास, प्रशासकीय कामकाज आणि देखभाल अदानी समूहाकडून करण्यात येईल. अदानी समूहाकडून देशातील अधिकाअधिक विमानतळांचा कारभार हाती घेण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवण्यात आले आहे.

संबंधित बातम्या:

‘महाराजा’साठी कोण बोली लावणार? हिंदूजा, टाटा की अदानी?

नवी मुंबई विमानतळ नामकरण वाद : प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांचे सिडको घेराव आंदोलन