
Direct tax collections: देशाच्या तिजोरीत प्रत्यक्ष कर संकलनाचा वाटा सतत वाढत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या 80 दिवसांसाठी सरकारने दिलेला डेटावरुन ही बाब स्पष्ट होत आहे. दुसरीकडे कॉर्पोरेट कर आणि बिगर-कॉर्पोरेट करामुळे सरकारच्या तिजोरीत वाढ झाली आहे. यामुळे सरकारी तिजोरीला मोठा फायदा झाला आहे. आगाऊ करातही वाढ दिसून आली आहे. तसेच परताव्यामध्ये चांगलीच वाढ दिसत आहे. आकडेवारी पाहिली तर ही वाढ 58 टक्के आहे. सरकारकडून करदात्यांना पुरवल्या जाणाऱ्या सेवेमुळे आणि जलद प्रक्रियेमुळे या कर परताव्यात वाढ झाली आहे, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.
सरकारकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारतातील प्रत्यक्ष कर संकलन म्हणजे आयकर 19 जूनपर्यंत 4.86 टक्के वाढला आहे. हे कर 5.45 लाख कोटी रुपये जमा झाले आहे. एकूण कर संकलनात कॉर्पोरेट कर, बिगर-कॉर्पोरेट कर, सुरक्षा व्यवहार कर आणि इतर करांचा समावेश आहे. मागील वर्षी हे कर 5,19,936 कोटी रुपये होते. ते आता 5,45,207 कोटी रुपये झाले आहे.
कर परताव्यात चांगली वाढ झाली आहे. कर परताव्यामधील ही वाढ 58.04 टक्के आहे. वर्षभरापूर्वी कर परतावा 54,661 कोटी रुपये होता. तो आता वाढून 86,385 कोटी रुपये झाला आहे. परंतु निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनात थोडी घसरण झाली आहे. ही घसरण 1.39 टक्के आहे. मागील वर्षी 4,65,275 कोटी रुपये प्रत्यक्ष कर संकलन होते. ते आता 4,58,822 कोटी रुपये झाले आहे.
एकूण आगाऊ कर संकलनामध्येही वाढ झाली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, आगाऊ कर संकलनात 3.87 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ती 1,55,533 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. कॉर्पोरेट अॅडव्हान्स टॅक्समध्ये सुमारे सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. हा आकडा 1,21,604 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. परंतु बिगर-कॉर्पोरेट अॅडव्हान्स टॅक्स 2.68 टक्क्यांनी कमी होऊन 33,928 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. एकंदरीत सरकारच्या तिजोरीत यंदा करांमुळे चांगलीच वाढ झाली आहे.