बीडमधून मोठी बातमी… धनंजय मुंडे यांच्या वर्चस्वाला धक्का ? काय आहे निवडणुकीची अपडेट ?
बीडमधील नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले आहे. अनेक ठिकाणी नगराध्यक्षपदावर भाजप उमेदवार आघाडीवर आहेत, तर अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. गेवराईमध्येही भाजपची सरशी झाली असून, अजित पवारांचे उमेदवार पिछाडीवर आहेत. धनंजय मुंडे आणि अजित पवारांसाठी हा निकाल अनपेक्षित मानला जात आहे.

बीडमधील नगर परिषद, नगर पंचायत आणि नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचे निकाल हाती येऊ लागले असून इथे धक्कादायक चित्र पहायला मिळत आहे. बीडमधून अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. बीडमध्ये अजित पवारांच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर गेल असून भाजपचीच आघाडी दिसत आहे. तसेच बीडच्याच गेवराई नगरपरिषदेतही भाजपच्याच उमेदवाराचा डंका वाजत असून तो आघाडीवर आहे. बीड जिल्ह्यात भाजपचेच वर्चस्व दिसत असून सर्वत्र भारतीय जनता पक्षाचेच उमेदवार आघाडीवर आहे. त्यामुळे बीडमध्ये हा धनंजय मुंडे यांच्यासाठी आणि पर्यायाने अजित पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. भाजपसाठी मात्र ही आघाडी चांगलीच फायदेशीर ठरताना दिसत आहे,
अजित पवारांच्या उमेदवाराला पछाडून भाजपची नगराध्यक्ष पदाची उमेदवार आघाडीवर
बीडमधून भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ज्योती घुमरे आघाडीवर असून दुसऱया क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या स्मिता वाघमारे आहेत. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार प्रेमलता पारवे या तिसऱ्या स्थानी ढकलल्या गेल्या असून हाँ अजित दादांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
गेवराई नगर परिषदेतही अजित पवारांच्या उमेदवाराला धक्का
बीडच्या गेवराई नगरपरिषदेतही असंच चित्र दिसत आहे. तिथे अजित पवार गटाच्या आमदार विजयसिंह पंडितांना मोठा धक्का बसला आहे. भाजपचे माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या भाऊजाई गिता पवार या इथे आघाडीवर असून अजित पवारांचे राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शितल दाभाडे पिछाडीवर पडल्या आहेत. तिथेही भाजपचाची सरशी होताना दिसत आहे.
बीड गेवराई नगर परिषदेतील नगरसेवक पदाचा निकाल समोर
बीड गेवराई नगर परिषदेतील एकुण 10 नगरसेवक पदासाठीचा निकाल जाहीर झाला असून भाजपचे 8 नगरसेवक विजयी तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 नगरसेवक विजयी झाले आहेत. नगराध्यक्ष पदाच्या भाजपच्या उमेदवार आघाडीवर तर अजित पवारांचे राष्ट्रवादीचे उमेदवार पिछाडीवर आहेत.
बीड जिल्ह्यात भाजपचा डंका
बीड जिल्ह्यात भाजपचा डंका वाजत असून सर्वत्र भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. सहापैकी सहा ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आघाडीवर आहेत. बीड, माजलगाव, धारूर, गेवराई येथे भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. परळीत भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी या आघाडीवर असून, अंबाजोगाई येथे भाजपचे नेते नंदकिशोर मुंदडा विजयी आहेत. तिथे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार राजकिशोर मोदी यांना पराभवाचा धक्का बसला आहे. बीडमध्ये आत्तापर्यंत 8 नगरसेवक पदाचे निकाल जाहीर यामध्ये भाजपचे तीन अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे तीन तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. गेवराई मध्ये 14 पैकी भाजपचे 10 नगरसेवक असून तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांना विजय मिळाला आहे.
