अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 चे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या

अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 28 जानेवारी रोजी दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार आहेत.

अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 चे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या
budget 2026
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jan 10, 2026 | 9:41 PM

अर्थसंकल्पीय अधिवेशन जवळ आले असून त्याचे वेळापत्र नेमके कसे आहे, याचीच सध्या चर्चा सुरू आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 28 जानेवारी रोजी दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार आहेत. यावेळी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 28 जानेवारीपासून सुरू होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग 9 व्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावेळी अर्थसंकल्प रविवार, 1 फेब्रुवारी रोजी सादर केला जाणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 28 जानेवारी रोजी दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील, अशी माहिती संसदीय कामकाज विषयक मंत्रिमंडळ समितीने निश्चित केलेल्या तात्पुरत्या वेळापत्रकाचा हवाला देत अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली.

अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 चे संपूर्ण वेळापत्रक

त्याच वेळी, नवीन वर्षाच्या पहिल्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपतींचे पारंपरिक भाषण होते. पण बीटिंग रिट्रीट सोहळ्यामुळे 29 जानेवारीला दोन्ही सभागृहांची बैठक होणार नाही. 30 जानेवारी रोजी संसदेची बैठक होणार आहे. त्यानंतर 31 जानेवारीला लोकसभा आणि राज्यसभेची बैठक होणार नाही. केंद्रीय अर्थसंकल्प रविवार, 1 फेब्रुवारी रोजी सादर केला जाईल.

ही सभा 13 फेब्रुवारी रोजी तहकूब करण्यात येणार

राष्ट्रपतींचे अभिभाषण आणि केंद्रीय अर्थसंकल्पावरील आभार प्रस्तावावरील चर्चेनंतर 13 फेब्रुवारी रोजी संसदेचे कामकाज सुमारे एक महिन्याच्या विश्रांतीसाठी तहकूब करण्यात येणार आहे. संसदेचे कामकाज 9 मार्च रोजी सुरू होणार असून गुरुवार 2 एप्रिल रोजी अधिवेशन संपणार आहे. साधारणत: संसदेचे अधिवेशन शुक्रवारी तहकूब केले जाते, परंतु 3 एप्रिलला गुड फ्रायडे आणि त्यानंतर आठवड्याच्या शेवटी अधिवेशन 2 एप्रिल रोजी संपू शकते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

यापूर्वी 28 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता

2016 पर्यंत 28 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जात होता, परंतु 2017 मध्ये मोदी सरकारने तो बदलून 1 फेब्रुवारी केला. अर्थसंकल्पातील तरतुदींची जलदगतीने अंमलबजावणी करणे आणि नवीन आर्थिक वर्षापूर्वी (1 एप्रिल) वैधानिक प्रक्रिया पूर्ण करणे हा अर्थसंकल्प सादर करण्याच्या तारखेत बदल करण्याच्या निर्णयाचा उद्देश आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थव्यवस्थेची गती कायम राखण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. त्याचबरोबर मध्यमवर्गीयांना थोडा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

अर्थमंत्री ‘या’ विक्रमाच्या एक पाऊल मागे

अर्थमंत्री निर्मला सीतारामन आता माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या विक्रमाच्या जवळ पोहोचल्या आहेत. मोरारजी देसाई यांनी एकूण 10 वेळा अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामन यंदाचा 9 वा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात सर्वाधिक वेळ अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या अर्थमंत्री आहेत.