Gautam Adani : गब्बर इज बॅक! दोनच दिवसांत रचला इतिहास

| Updated on: May 24, 2023 | 9:14 AM

Gautam Adani : गौतम अदानी यांनी श्रीमंतांच्या यादीत जोरदार झेप घेतली. दोन दिवसांत त्यांनी कमाईचा उच्चांक गाठला, श्रीमंतांच्या यादीतील त्यांच्या घसरणीला यामुळे ब्रेक लागला.

Gautam Adani : गब्बर इज बॅक! दोनच दिवसांत रचला इतिहास
Follow us on

नवी दिल्ली : अदानी समूहाचे (Adani Group) चेअरमन गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यासाठी सोमवार आणि मंगळवार मोठे लक्की ठरले. गेल्या पाच महिन्यांपासून संकटांची मालिका सुरु होती. मध्यंतरी त्याला ब्रेक ही लागला. पण या समूहासाठी संकट सांगूनच येत होती, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण सुप्रीम कोर्टाच्या विशेष समितीच्या अहवालानंतर या ग्रुपवरील मळभ दूर झाले आहे. त्यानंतर अदानी समूहाच्या सूचीबद्ध 10 शेअरपैकी अनेक शेअर्सने जोरदार धाव घेतली. त्याचा फायदा अदानी यांना मिळाला. श्रीमंतांच्या यादीत त्यांनी जोरदार भरारी घेतली.

इतकी केली कमाई
या दोन दिवसांत त्यांच्या एकूण संपत्ती 9.73 अब्ज डॉलरने म्हणजे जवळपास 8,06,17,42,85,000 रुपयांची तेजी आली. 24 जानेवारी 2023 रोजी हिंडनबर्ग रिसर्चचा अहवाल आला. नंतर अदानी समूहाची जी वाताहत झाली, त्याला सगळेच साक्षी आहेत. अदानी समूहाचे शेअर दणकन आपटले. पण आता हा समूह सावरत आहे.

रिपोर्टचा सांगावा
ब्लूमबर्ग बिलेनिअर्स अहवालानुसार अदानी यांची नेटवर्थ आता 64.2 अब्ज डॉलरवर पोहचली आहे. त्यांनी घसरणीला ब्रेक लावला. श्रीमंतांच्या यादीत 23 व्या क्रमांकावरुन त्यांनी 18 व्या क्रमांकावर उडी घेतली आहे. सोमवारी त्यांची नेटवर्थ 5.35 अब्ज डॉलर होती. मंगळवारी त्यात पुन्हा 4.38 अब्ज डॉलरची तेजी दिसून आली. या पाच महिन्यांत त्यांच्या एकूण संपत्तीत 56.4 अब्ज डॉलरची घसरण दिसून आली.

हे सुद्धा वाचा

12 लाख कोटींचा फटका
अमेरिकन शॉर्ट सेलिंग फर्म हिंडनबर्ग रिसर्चने अदानी समूहाची पोलखोल करण्याचा दावा केला होता. या फर्मच्या अहवालानंतर भारतासह जगात खळबळ माजली होती. अदानी समूहाने सर्व आरोप फेटाळले होते. पण तरीही समूहाच्या सर्व शेअरमध्ये घसरणीचे सत्र सुरु झाले होते. या सर्व घडामोडीत अदानी समूहाचे मार्केट कॅप 12 लाख कोटींनी घसरले.

सुप्रीम दिलासा
सुप्रीम कोर्टाच्या विशेष समितीच्या अहवालानंतर अदानी समूहाला मोठा दिलासा मिळाला होता. समूहाच्या 10 सूचीबद्ध कंपन्यांचे शेअर तुफान तेजीत आहे. सोमवार आणि आज मंगळवारी तेजीचे सत्र कायम होते. काल पण हे शेअर 19 टक्क्यांनी वधारले. सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष समितीने अदानी समूहाच्या शेअरमधील भावात कोणतीच गडबडी नसल्याचा अहवाल दिला होता. याविषयीचा कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याचा दावा करण्यात आला. सेबीच्या (SEBI) तपासातही काहीच हाती लागले नसल्याचे समोर आले आहे.

आशियात दुसऱ्या स्थानावर
नेटवर्थमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने आशियातील श्रीमंतांच्या यादीत अदानी हे दुसऱ्या स्थानावर आले आहेत. त्यांनी चीनच्या झोंग शेनशॅन यांना मागे टाकले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) 84.1 अब्ज डॉलरसह या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. मंगळवारी त्यांची एकूण संपत्ती 54.9 लाख डॉलर होती. ते जगातील श्रीमंतांच्या यादीत 13 व्या क्रमांकावर आहेत.