Gold Hallmarking: सोन्याच्या दागिन्यांवरील हॉलमार्किंगचा ग्राहकांना काय फायदा होणार?

| Updated on: Jun 16, 2021 | 2:57 PM

Gold Hallmarking: भेसळयुक्त सोन्यामुळे ग्राहकांची फसवणूक झाली तरी त्यांना दाद मागण्यासाठी प्रभावी मार्ग उपलब्ध नव्हता. कारण बहुतांश सोनार ग्राहकांना सोने खरेदीची कच्ची पावती देत होते.

Gold Hallmarking: सोन्याच्या दागिन्यांवरील हॉलमार्किंगचा ग्राहकांना काय फायदा होणार?
सोन्याचा दर
Follow us on

मुंबई: देशभरात आजपासून सोन्याच्या दागिन्यांची विक्री करताना त्यावर हॉलमार्क असणे बंधनकारक असेल. या नियमानुसार, आता 14,18 आणि 22 कॅरेटच्या सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क (BIS Hallmark) असेल तरच त्यांची विक्री करता येईल. अन्यथा संबंधित सराफा व्यापाऱ्याला दागिन्याच्या किंमतीच्या पाचपट दंड अथवा एक वर्षाचा कारावास होऊ शकतो. (What benefit will customer get due to Gold Hallmarking)

मात्र, या नियमामुळे ग्राहकांना नक्की काय फायदा होणार, असा प्रश्न आता विचारला जात आहे. हॉलमार्किंगचा मुख्य फायदा म्हणजे आता भेसळयुक्त सोन्याच्या माध्यमातून होणारी ग्राहकांची फसवणूक बंद होणार आहे. सध्याच्या घडीला देशात 4 लाखांपेक्षा जास्त व्यापारी पेढ्या आहेत. मात्र, यापैकी 35,879 सराफा व्यापाऱ्यांकडेच BIS प्रमाणपत्र आहे. त्यामुळे भेसळयुक्त सोन्यामुळे ग्राहकांची फसवणूक झाली तरी त्यांना दाद मागण्यासाठी प्रभावी मार्ग उपलब्ध नव्हता. कारण बहुतांश सोनार ग्राहकांना सोने खरेदीची कच्ची पावती देत होते. मात्र, आता सराफा व्यापारी 14, 18 आणि 22 कॅरेटचेच दागिने विकू शकतील. हे दागिने प्रमाणित असल्यामुळे भेसळीचा प्रश्न निकालात निघेल.

कोणत्या गोष्टींना हॉलमार्किंगच्या नियमातून सूट?

केंद्र सरकारने दागिन्यांसाठी हॉलमार्किंग बंधनकारक केले असले तरी काही गोष्टींना यामधून वगळण्यात आले आहे. यामध्ये सोन्याची घड्याळे, फाऊंटन पेन, कुंदन, पोलकी, जडाव यासारख्या विशिष्ट दागिन्यांचा समावेश आहे. हॉलमार्किंगसाठीची नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन स्वरुपातही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्व सराफा व्यापाऱ्यांना आपल्या दागिन्यांवर हॉलमार्किंग लावणे बंधनकारक राहील.

हॉलमार्किंग म्हणजे नेमकं काय?

सोने, चांदी आणि प्लॅटिनमच्या शुद्धतेचे प्रमाणिकरण करण्याचे एक साधन म्हणजे हॉलमार्किंग. एखाद्या धातूची विश्वासार्हता प्रदान करण्याचे माध्यम म्हणजे हॉलमार्किंग असे म्हटलं जाते. हॉलमार्किंगची संपूर्ण प्रक्रिया देशभरातील हॉलमार्किंग केंद्रांवर केली जाते. त्याचे निरीक्षण भारतीय मानक ब्युरो (BIS) द्वारे केले जाते. जर दागिन्यांवर हॉलमार्क असेल तर ते शुद्ध आहे, असे प्रमाणित केले जाते.

BIS चा हॉलमार्क हा सोन्यासह चांदीच्या शुद्धतेचे प्रमाणिकरण दर्शवतो. कोणत्याही दागिन्यांवर BIS चिन्ह असणे म्हणजे ते भारतीय मानक ब्यूरोच्या मानदंडांवर योग्य असल्याचे समजले जाते. त्यामुळे सोने खरेदी करण्यापूर्वी, दागिन्यांवर BIS चा हॉलमार्क आहे की नाही, याची खात्री करा. जर त्यावर हा हॉलमार्क असेल तर ते सोनं शुद्ध आहे. मात्र अनेकदा काही ज्वेलर्स तपास न करता हॉलमार्किंग करतात. त्यामुळे तो हॉलमार्क खरा आहे की नाही याची तपासणी करणे आवश्यक आहे.

भारतीय मानक ब्युरो (BIS) मूळ हॉलमार्क हे त्रिकोणी आकाराचे आहे. त्यावर हॉलमार्किंग सेंटरच्या लोगोसह सोन्याची शुद्धताही लिहिलेली असते. तसेच त्या दागिन्यांच्या उत्पादनाचे वर्ष आणि निर्मात्याचा लोगो देखील त्यावर असतो.

संबंधित बातम्या:

Gold Hallmarking: सोने हॉलमार्किंगचा नवा नियम लांबणीवर पडणार? वाचा नेमकं कारण

Gold Hallmarking: हॉलमार्किंग बंधनकारक; आता सोन्याच्या जुन्या दागिन्यांचं काय होणार?

(What benefit will customer get due to Gold Hallmarking)