सोन्यामध्ये रेनियम आणि इरिडियम का मिसळले जातात? जाणून घ्या दागिन्यांचे वजन कसे वाढवले जाते?
सोन्याच्या वाढत्या किमती आणि दुकानांमध्ये वापरल्या जाणाऱ्या तपासणी यंत्रांना चकवण्याची शक्यता पाहता, सोन्यामध्ये रेनियम आणि इरिडियम सारख्या धातूंची भेसळ होण्याचा धोका वाढला आहे. दागिन्यांचे वजन कृत्रिमरीत्या वाढवण्यासाठी या धातूंचा वापर नेमका कसा हे जाणून घ्या.

आपल्या भारतात कोणताही सण असो वा उत्सव, लग्न कार्य असो सोनं महत्त्वाचं आहे. पण गेल्या काही काळात सोने-चांदीचे भाव गगनाला भिडले आहेत. सोनं खरेदी करताना भारतीय सोन्याची शुद्धता आणि वजनाकडे लक्ष देतात. बहुतेक लोक २२-कॅरेट किंवा १८-कॅरेट सोन्याचे दागिने खरेदी करतात. परंतु, असा विचार करा की, तुम्हाला २२-कॅरेट असल्याचे सांगून विकलेल्या दागिन्यांमध्ये प्रत्यक्षात केवळ २०-कॅरेट सोन्याइतकीच शुद्धता असेल तर? किंवा १८-कॅरेट म्हणून विकलेल्या दागिन्यांमध्ये प्रत्यक्षात केवळ १४-कॅरेट सोने असेल तर? अलीकडच्या काळात, सोन्यामध्ये रेनियम (rhenium) आणि इरिडियम (iridium) सारख्या जड धातूंची भेसळ केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे, ज्यामुळे लोकांच्या मनात असे प्रश्न निर्माण झाले आहेत.
खरंतर, काही तपासणी आणि व्यापाऱ्यांच्या तक्रारींतून असे समोर आले आहे की, सोन्याच्या दागिन्यांचे वजन वाढवण्यासाठी काही विशिष्ट धातूंचा वापर केला जाऊ शकतो. यामुळे दागिन्यांचे एकूण वजन तर वाढते, परंतु त्यातील सोन्याचे प्रत्यक्ष प्रमाण मात्र ‘जैसे थे’च राहते. हे धातू नेमके कोणते आहेत आणि ते सोन्याच्या शुद्धतेवर कसा परिणाम करू शकतात, हे आपण जाणून घेऊया.
रेनियम आणि इरिडियम म्हणजे काय?
रेनियम आणि इरिडियम हे दुर्मिळ, जड धातू आहेत. या दोन्ही धातूंचा वापर जास्त करून वापर प्रामुख्याने जेट इंजिने, उच्च तापमानाला काम करणारी औद्योगिक उपकरणे आणि वैज्ञानिक उपयोगांसाठी केला जातो. या दोन्ही धातूंचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची उच्च घनता.
किती असते सोन्याची घनता?
शुद्ध सोन्याची घनता १९.३ ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर इतकी असते, तर रेनियमची घनता सुमारे २१ ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर आणि इरिडियमची घनता सुमारे २२.५ ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर असते. म्हणूनच, सोन्यामध्ये या जड धातूंचे मिश्रण केल्यास दागिन्यांचे वजन वाढू शकते.
टेस्टमधून काय समोर आलं?
एक टेस्ट करण्यात आली. या टेस्टमध्ये २४ कॅरेट सोन्याच्या ७.८३ ग्रॅम वजनामध्ये १ ग्रॅम रेनियम पावडर मिसळण्यात आली. यामुळे मिश्रणाचे वजन ८.८३ ग्रॅम झाले. त्यानंतर, दागिना तयार करण्यासाठी त्यात आणखी एका धातूचे ०.७५ ग्रॅम वजन मिळवण्यात आले. अशा प्रकारे तयार झालेल्या दागिन्याचे फायनल वजन ९.५८ ग्रॅम इतके झाले.
या प्रकरणात, तपासकर्त्यांनी सांगितले की, तयार दागिन्यांवर 22 कॅरेट सोन्याचे अर्थात 916 चा हॉलमार्क पण लावला जात आहे. पण त्यात सोनं फक्त 20 कॅरेट आहे. याचा अर्थ असा की, ग्राहकाला दागिने अधिक जड वाटू शकतात, परंतु त्यांनी मोजलेल्या किमतीच्या तुलनेत त्यांना मिळणाऱ्या सोन्याचे प्रमाण कमी असते. याच प्रमाणे पैसेही दिले जातात.
तपासात का नाही समजत भेसळ?
सोन्याची शुद्धता टेस्ट करण्यासाठी अनेक पद्धती आहेत. यामध्ये ॲसिड टेस्ट, टचस्टोन टेस्ट आणि एक्स-रे फ्लोरोसेन्स (XRF) मशिन यांसारख्या विविध पद्धतींचा आहेत. अनेक ज्वेलरी शोरूममध्ये एक्स-रे फ्लोरोसेन्स मशीनने दागिन्यांची शुद्धता टेस्ट केली जाते. ही मशीन दागिन्यांमध्ये असलेल्या धातूंबद्दल माहिती देतात.
मात्र, जर दागिन्याच्या आतील आणि बाहेरील भागातील धातूचे प्रमाण वेगवेगळे असेल, तर केवळ पृष्ठभागाची तपासणी पुरेशी ठरणार नाही. म्हणूनच, दागिन्यांमध्ये भेसळ म्हणून असलेल्या जड धातूंचे अस्तित्व शोधणे कठीण होऊन जातात.