Gold Rate Forecast : सोन्याचे भाव कोसळत असताना कॅनडाच्या वॉरेन बफेटने खेळली एकदम उलटी चाल, निर्णय अचूक ठरला तर पाण्यासारखा पैसा कमावणार
Gold Rate Forecast : सध्या सोन्याचे भाव कोसळत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 8 टक्क्यापर्यंत कोसळलं आहे. अशावेळी कॅनडाचे वॉरन बफेट म्हणून ओळखले जाणारे प्रेम वत्सा एकदम उलटी चाल खेळले आहेत.

Gold Rate Forecast : सध्या सोन्याच्या बाजारात ज्या घडामोडी घडतायत, त्यामुळे सर्वसामान्य आनंदात आहेत. कारण सोन्याच्या दरांमध्ये सातत्याने घसरण होत आहे. त्यामुळे गुंतवणूकदार घाबरुन पैसा काढून घेत आहेत. बाजारात ही भिती असताना कॅनडामधील अब्जाधीश गुंतवणूकदार प्रेम वत्सा यांनी एकदम उलट चाल खेळली आहे. आपल्या गुंतवणूकीच्या शैलीमुळे प्रेम वत्सा यांना कॅनडाचं वॉरेन बफेट म्हटलं जातं. वत्सा यांनी सोन्याच्या खाणीशी संबंधित दोन मोठ्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा लावला आहे. प्रेम वत्सा यांच्या वीमा आणि गुंतवणूक कंपनी फेयरफॅक्स फायनेंशियल होल्डिंग्सच्या तिसऱ्या तिमाहीचा रिपोर्ट समोर आला आहे. रिसर्च प्लॅटफॉर्म गुरुफोकस नुसार, कंपनीचे अमेरिकी शेअर पोर्टफोलियोमध्ये एकूण 34 शेअर्स आहेत. त्याची किंमत जवळपास 2.65 अब्ज डॉलर आहे. यात 44.4 टक्के हिस्सा दोन गोल्ड मायनिंग कंपन्यांचा आहे.
कंपनीने इक्विनॉक्स गोल्डमध्ये नवीन गुंतवणूक करत 5.84 कोटीचे शेअर्स विकत घेतले आहेत. त्याची किंमत 64.9 कोटी डॉलर (24.51%) आहे. एल्डोराडो गोल्ड मध्ये जवळपास 52.7 कोटी डॉलरची (19.89%) हिस्सेदारी कायम ठेवली आहे. दोघांमधील एकूण गुंतवणूक 1.17 अब्ज डॉलर पेक्षा जास्त आहे. याच तिमाहीत कंपनीने ओरला मायनिंग (Orla Mining) मधून पैसा काढून घेतला. 13F फायलिंग मध्ये फक्त अमेरिकी शेअर्सची माहिती असते. यात वत्सा यांचं टार्गेट काय आहे हे सांगितलेलं नाही.
मायनिंग कंपन्यांच्या शेअर्समध्ये पैसा लावणं जास्त फायद्याचा सौदा का?
थेट सोनं खरेदीपेक्षा मायनिंग कंपन्यांच्या शेअर्समध्ये पैसा लावणं जास्त फायद्याचा सौदा ठरु शकतो. या कंपन्या बाजारभावाने सोनं विकतात. मजूर, वीज आणि मशीनचा खर्च ठरलेला असतो. सोन्याचे भाव खर्चाच्या तुलनेत वेगाने वाढतात. त्यामुळे या कंपन्यांचं प्रॉफिट अनेक पटींनी वाढतं . यात धोका सुद्धा असतो. सोन्याचे भाव दीर्घकाळासाठी पडले, खाणीतील काम थांबलं, तर या शेअर्सवर मोठं नुकसान होऊ शकतं.
आठ महिन्यातील ही सर्वात मोठी साप्ताहिक घसरण
रॉयटर्स नुसार 20 नोव्हेंबरला स्पॉट गोल्ड कोसळून 3,585.92 डॉलर प्रति औंस झालं. त्याआधी 3,513.54 डॉलर पर्यंत घसरण झालेली. सप्टेंबर 2025 नंतरचा हा सर्वात खालचा स्तर आहे. एका आठवड्यात सोन्याचे भाव 8 टक्क्यांनी कोसळले आहेत. आठ महिन्यातील ही सर्वात मोठी साप्ताहिक घसरण आहे.