
अवघ्या काही दिवसांमध्ये 2026 ला सुरूवात होणार आहे. या आगामी नवीन वर्षात सर्व सामान्य जनतेला दिलासा मिळणार आहे. कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) आणि घरगुती पाईपद्वारे वापरल्या जाणाऱ्या नॅचरल गॅस (PNG) च्या किमती कमी होणार आहेत. पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्ड (PNGRB) ने 1 जानेवारी 2026 पासून लागू किमती कमी होणार असल्याची माहिती दिली आहे. एका विशेष मुलाखतीत PNGRB चे सदस्य ए.के. तिवारी म्हणाले यांनी, नवीन टॅरिफ रचनेमुळे प्रति युनिट 2 ते 3 रुपयांची बचत होणार आहे. याचा थेट फायदा सर्वसामान्य जनतेला होणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
PNGRB ने नवीन यनिफाईड टॅरिफ स्ट्रक्चरची घोषणा केली आहे. यात झोनची संख्या तीनवरून दोन करण्यात आली असल्याने टॅरिफ सिस्टम सोपी झाली आहे. 2023 मध्ये अंतरावर आधारित तीन झोन तयार करण्यात आले होते. यात 200 किलोमीटरपर्यंतसाठी 42 रुपये, 300 ते 1200 किलोमीटरसाठी 80 रुपये आणि 1200 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी 107 रुपये टॅरिफ होते. मात्र आता यात बदल करण्यात आला आहे. ए. के. तिवारी यांनी सांगितले की, ‘आम्ही दरांचे तर्कसंगतीकरण केले आहे. आता तीन ऐवजी 2 झोन असणार आहेत. पहिला झोन संपूर्ण भारतातील सीएनजी आणि घरगुती पीएनजी ग्राहकांना लागू होईल. झोन 1 साठी 54 रुपये टॅरिफ असणार आहे, जे आधी 80 आणि 107 रुपये होते.
नवीन दर रचनेचा फायदा भारतात कार्यरत असणाऱ्या 40 शहर गॅस वितरण (CGD) कंपन्यांच्या 312 भौगोलिक क्षेत्रातील ग्राहकांना होणार आहे. तिवारी म्हणाले की, ‘याचा फायदा सीएनजी वापरणाऱ्या वाहतूक क्षेत्राला आणि स्वयंपाकासाठी पीएनजी वापरणाऱ्या जनतेला होणार आहे.’ आता पीएनजीआरबीने या दराचे पूर्ण फायदे ग्राहकांना द्यावेत आणि आम्ही नियमितपणे यावर लक्ष ठेवणार असल्याची माहिती दिली आहे.
सीएनजी आणि पीएनजी पायाभूत सुविधांच्या विस्ताराबाबत बोलताना तिवारी यांनी म्हटले की, ‘सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, खाजगी कंपन्या आणि संयुक्त उपक्रमांसह संपूर्ण देशाला कव्हर करण्यासाठी परवाने देण्यात आले आहेत. पीएनजीआरबी सीजीडी कंपन्यांना राज्य सरकारांशी समन्वय साधण्यास मदत करत आहे, ज्यामुळे अनेक राज्ये व्हॅट कमी करत आहेत आणि मंजुरी प्रक्रिया सुलभ करत आहेत, यामुळे सीएनजी आणि पीएनजीचा विस्तार आणखी वाढताना दिसत आहे.
तिवारी म्हणाले, “आम्ही केवळ नियामक म्हणून काम करत नाही तर एक सुविधा देणारा म्हणून देखील काम करत आहोत.” सीएनजी आणि घरगुती पीएनजीसाठी परवडणारा आणि तर्कसंगत गॅस पुरवण्याच्या सरकारच्या पुढाकारामुळे देशभरात नैसर्गिक गॅस वापराला गती मिळण्याची अपेक्षा आहे. सीजीडी क्षेत्र हे भारतातील नैसर्गिक गॅस वापराचे एक प्रमुख चालक मानले जाते.