
Income Tax Rules : डिजिटल युगात, व्यवहार सुद्धा डिजिटल झाले आहेत. देशात UPI ने मोठी क्रांती आणली आहे. झटपट व्यवहारासाठी आता युपीआयचा मार्ग निवडण्यात येतो. भाजीपाल्यापासून ते शैक्षणिक शुल्क भरण्यापर्यंत आता सहज युपीआयचा वापर करण्यात येतो. अनेकदा एकमेकांना आर्थिक सहाय्यासाठी रोखीचा वापर कमी होऊन थेट युपीआयद्वारे रक्कम पाठवण्यात येते. 50 हजार अथवा त्यापेक्षा अधिकची रक्कम तुम्ही जर पाठवली अथवा प्राप्त केली तर तुम्हाला आयकर लागतो का? काय सांगतो याविषयीचा नियम, जाणून घ्या.
काय सांगतो तो नियम?
आयकर कायदा 1961 च्या कलम 56(2) अंतर्गत, व्यवहारासंबंधी काही नियम आहेत. जर तुम्हाला कोणी भेटवस्तू दिली तर त्यावर कर लागत नाही. भेटवस्तू, आर्थिक मदत आयकर कक्षेच्या बाहेर असते. पण त्यासाठी काही मर्यादा आहेत. या मर्यादेबाहेर ही रक्कम असेल तर त्यावर मात्र आयकर आकारण्यात येतो.
तर कराचा दट्या
आयकर अधिनियमातील तरतुदीनुसार, नात्यातील कोणी तुम्हाला कोणतीही रक्कम , भेटवस्तू दिल्यास त्यावर कर आकारण्यात येत नाही. पण कुटुंबातील व्यक्ती नसल्यास, दूरचा नातेवाईक असल्यास, दोन व्यक्तीत काही व्यवहार होत असल्यास कर लागू शकतो. 50 हजारांपेक्षा ही रक्कम अधिक असेल तर आयकर नियमानुसार, जादा रक्कमेवर आयकर द्यावा लागेल.
नातेवाईकांची व्याख्या समजून घ्या
कुटुंबातील व्यक्तीने भेटवस्तू, पैसे दिल्यास त्या व्यवहारावर कर आकारल्या जात नाही. पण आता अनेकांची कुटुंब मोठी असतात. त्यात आत्या, मामापासून इतर नातेवाईक असतात. पण नियमानुसार, जवळचे नातेवाईकांत त्यांच्या समावेश होत नाही. आई-वडील, भाऊ, बहिण, पती-पत्नी यांचा यामध्ये समावेश होतो. विशिष्ट समारंभ, कार्यक्रम, लग्न, मंगलकार्यादरम्यान महागडी भेट वस्तू दिल्यास त्यावर कर आकारण्यात येत नाही. पण इतरांनी जर तुम्हाला युपीआय माध्यमातून मोठी रक्कम दिली तर आयकर अधिनियमानुसार, तुमच्या स्लॅबनुसार तुम्हाला आयकर भरावा लागू शकतो. याविषयी तुमच्या कर सल्लागाराचा सल्ला घेणे आणि मदत घेणे सोयीस्कर राहिल.