‘आरबीआय’ने प्रथमच दाखवला आपला गुप्त खजिना, केंद्रीय बँकेकडे किती टन आहे सोने?

सेंट्रल बँकचा सोन्याचा भंडार १९९१ च्या आर्थिक संकटानंतर अनेक पटींनी वाढला आहे. देशाचा रिझर्व्ह गोल्ड ८७० टन असून तो विविध ठिकाणी सुरक्षित ठेवला आहे. हा सोना फक्त धातू नाही तर देशाची आर्थिक शक्ती असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

आरबीआयने प्रथमच दाखवला आपला गुप्त खजिना, केंद्रीय बँकेकडे किती टन आहे सोने?
| Updated on: Jun 29, 2025 | 2:35 PM

भारतीय लोकांना सोन्याचे आकर्षण आहे. यामुळे भारतात प्रत्येक घराघरात सोने आहे. घराघराप्रमाणे भारतीय रिझर्व्ह बँकेत (आरबीआय) सोने असते. या सोन्याला खूप महत्व असते. १९९१ मधील आर्थिक संकटानंतर आरबीआयकडील सोने अनेक पटींनी वाढले आहे. आरबीआयकडील सोन्याचा साठा ८७० टनापर्यंत गेला आहे. केंद्रीय बँकेने १२.५ वजनाच्या सोन्याच्या विटांच्या माध्यमातून हे सोने विविध ठिकाणी ठेवले आहे. आरबीआयने एका माहितीपटात ही माहिती दिली आहे. या माहितीपटाच्या माध्यमातून आरबीआयने प्रथमच आपली ‘गोल्ड वॉल्ट’ दाखवली आहे.

सर्वाधिक नोटांची छपाई भारतात

आरबीआयने आपल्या कामकाजाची माहिती सर्वसामान्य लोकांना व्हावी, यासाठी एक माहितीपटाच्या (डॉक्युमेंट्री) माध्यमातून माहिती दिली आहे. त्यात म्हटले आहे की, जगात सर्वाधिक करेन्सी नोटांचे उत्पादन भारतात होते. अमेरिकेत जवळपास ५ हजार कोटी युनिट, युरोपमध्ये २९०० कोटी युनिटची छपाई होती. परंतु भारतात १३ हजार कोटी युनिटची छपाई होते. २ मे २०२५ रोजी दिलेल्या आकडेवारीनुसार देशात चलनात असणाऱ्या एकूण नोटांचे मूल्य ३८.१ कोटी रुपये आहे.

प्रथमच दाखवली आरबीआयची तिजोरी

आरबीआयने प्रथमच आपल्या कार्याची माहिती डॉक्युमेंट्रीच्या माध्यमातून दिली आहे. आरबीआय ‘अनलॉक्ड: बियॉन्ड द रुपी’ नावाची मालिका जिओ हॉटस्टारसोबत सुरु केली आहे. यामध्ये प्रथमच आरबीआयने आपल्या गोल्ड वॉल्ट (तिजोरी) दाखवले आहे.

डॉक्युमेंट्रीनुसार, सेंट्रल बँकचा सोन्याचा भंडार १९९१ च्या आर्थिक संकटानंतर अनेक पटींनी वाढला आहे. देशाचा रिझर्व्ह गोल्ड ८७० टन असून तो विविध ठिकाणी सुरक्षित ठेवला आहे. हा सोना फक्त धातू नाही तर देशाची आर्थिक शक्ती असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. अर्थव्यवस्थेत चढ उतार येतील, पण सोन्याचे मूल्य कायम असणार आहे.

भारतीय कागदावर नोटांची छपाई

डॉक्युमेंट्रीनुसार, आज चलनी नोटा छापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व गोष्टी म्हणजे मशीनपासून ते शाईपर्यंत सर्व काही फक्त भारतातच बनवल्या जातात. पूर्वी आयात केलेल्या कागदाचा वापर करून नोटा छापल्या जात होत्या. हे कागद जगातील काही मोजक्या कंपन्यांनी बनवले होते. त्यामुळे या कंपन्यांचे बाजारपेठेत वर्चस्व होते आणि त्यामुळे बाजारात बनावट नोटा येण्याची शक्यता नेहमीच होती. परंतु आता भारतात तयार झालेल्या कागदाचा वापर नोटा छापण्यासाठी होत आहे.