
भारतीय संरक्षण क्षेत्राशी संबंधित म्युच्युअल फंडांमध्ये सध्या नेत्रदीपक तेजी पाहायला मिळत आहे. गेल्या महिनाभरात या फंडांनी 13.67 टक्क्यांपासून 18.75 टक्क्यांपर्यंत उत्तम परतावा दिला आहे, जो उर्वरित शेअर बाजाराच्या तुलनेत बराच चांगला आहे. अलीकडील भौगोलिक तणाव आणि देशांतर्गत संरक्षण उद्योगाला चालना देणारी सरकारी धोरणे यामुळे ही वाढ झाली आहे.
विशेषत: संरक्षण उत्पादन, एव्हिओनिक्स आणि इलेक्ट्रॉनिक सिस्टिमशी संबंधित कंपन्यांच्या समभागांमध्ये जोरदार तेजी दिसून येत आहे. या कंपन्यांनी भरघोस परतावा दिला असून, याचा थेट फायदा या म्युच्युअल फंडांना झाला आहे.
निफ्टी इंडिया डिफेन्स इंडेक्स 5.5 टक्क्यांनी वधारला
व्हॅल्यू रिसर्चच्या आकडेवारीनुसार, बहुतेक डिफेन्स म्युच्युअल फंड निफ्टी इंडिया डिफेन्स इंडेक्सचा मागोवा घेतात. सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या फंडांमध्ये ग्रो निफ्टी इंडिया डिफेन्स ईटीएफ आणि फंड ऑफ फंड्स यांचा समावेश आहे, ज्यांनी अनुक्रमे 18.52 टक्के आणि 18.75 टक्के परतावा दिला. याशिवाय आदित्य बिर्ला सन लाइफ निफ्टी इंडिया डिफेन्स इंडेक्स फंड आणि मोतीलाल ओसवाल निफ्टी इंडिया डिफेन्स ईटीएफनेही 18 टक्क्यांहून अधिक परतावा दिला. मात्र, एचडीएफसी डिफेन्स फंडाने 13.67 टक्के परतावा दिला, जो उर्वरित फंडांच्या तुलनेत थोडा कमी आहे, तरीही ही चांगली कामगिरी आहे. सरकारच्या नव्या धोरणांचा आणि बाजारपेठेच्या परिस्थितीचा या फंडांना मोठा फायदा झाला असून, त्यामुळे संरक्षण क्षेत्राकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.
सेक्टोरल इंडेक्समध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारा निफ्टी इंडिया डिफेन्स इंडेक्स 5.5 टक्क्यांनी वधारून 8,309.15 वर तर निफ्टी 50 निर्देशांक किरकोळ घसरणीसह 25,019.80 वर बंद झाला. डिसेंबर 2024 मध्ये उच्चांकी पातळी गाठणाऱ्या डिफेन्स म्युच्युअल फंडांसाठी मागील सहा महिने काहीसे अस्थिर राहिले आणि त्यानंतर 2025 च्या सुरुवातीला काही सुधारणा झाली.
मात्र, एप्रिलमध्ये परिस्थिती बदलली आणि मे महिन्यात त्यात 17.7 टक्क्यांची झपाट्याने वाढ झाली. ऑपरेशन सिंदूर आणि नवीन सरकारी खर्च योजनांमुळे ही वाढ झाली आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास पुन्हा वाढला आहे.
डिफेन्स शेअर्समध्ये प्रचंड वाढ
निफ्टी इंडिया डिफेन्स इंडेक्सशी संबंधित शेअर्समध्ये नुकतीच जोरदार तेजी दिसून आली आहे. गेल्या 6 दिवसांत निर्देशांक 18 टक्क्यांनी वधारला, तर निफ्टी 50 मध्ये केवळ 3 टक्के वाढ झाली. पारस डिफेन्स, डेटा पॅटर्न, डीसीएक्स सिस्टीम्स आणि भारत डायनॅमिक्स सारख्या कंपन्यांनी अवघ्या एका महिन्यात 24 ते 37 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे.
कोचीन शिपयार्ड, जीआरएसई, माझगाव डॉक, झेन टेक्नॉलॉजीज, एचएएल आणि एमटीएआर टेक्नॉलॉजीज या कंपन्यांना 3 ते 12 टक्क्यांपर्यंत फायदा झाला आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स, सोलर इंडस्ट्रीज, एमडीएल आणि बीडीएल सारख्या अनेक समभागांनी उच्चांक गाठला आहे.
संरक्षण क्षेत्रातील वाढत्या रुचीमागे अनेक महत्त्वाची कारणे
संरक्षण क्षेत्रातील वाढत्या रुचीमागे अनेक महत्त्वाची कारणे आहेत. सर्वप्रथम देशांतर्गत संरक्षण उद्योगाला चालना देण्याच्या धोरणावर सरकार सातत्याने काम करत असल्याने खासगी कंपन्या आणि गुंतवणूकदारांना या क्षेत्रात नवनवीन संधी दिसत आहेत. याशिवाय ऑपरेशन सिंदूरसारख्या अलीकडच्या सामरिक आणि भौगोलिक तणावामुळे संरक्षण क्षेत्राचे महत्त्व अधिकच वाढले आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारताने आपली संरक्षण शक्ती आणि पुरवठा साखळी आत्मनिर्भर करण्याची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे गुंतवणूकदारांना या क्षेत्रात दीर्घकाळात वाढीची मोठी शक्यता दिसत असल्याने डिफेन्स म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत झपाट्याने वाढ झाली आहे.
(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)