
इराण-इस्त्रायल युद्धाच्या दरम्यान पहिल्याच व्यापारी सत्रात भारतीय शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना झटका दिला. दलाल स्ट्रीट या जागतिक तणावात लालेलाल झाला. सकाळच्या सत्रात मुख्य निर्देशांक सेन्सेक्स 586.19 अंकांनी घसरला. बाजार सकाळी 81,821.43 अंकावर व्यापार करत होता. 10 मिनिटातच गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडाले. सेन्सेक्सच्या 30 पैकी 25 कंपन्या लाल रंगात न्हाऊन निघाल्या. केवळ 5 कंपन्यांमध्ये थोडी उलाढाल दिसली. डिफेन्स सेक्टरच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर फार्मा कंपन्यासहित टेक, ऑटो क्षेत्रातील शेअर दबावाखाली व्यापार करताना दिसत आहे. तर निफ्टी 50 गेल्या बंद 25,112.40 अंकावरून 24,939.75 वर उघडला. त्यात 1 टक्का घसरून हा निर्देशांक 24,891 अंकांपेक्षा खाली घसरला.
या कंपन्यांना बसला फटका
इराण-इस्त्रायल युद्धात अमेरिकेने पण उडी घेतली. अमेरिकेने इराणच्या अणुप्रकल्पावर हल्ला चढवला. त्याची धास्ती जागतिक शेअर बाजारात दिसून आली. विविध शेअर बाजारात भीतीची लाट पसरली. भारतीय शेअर बाजारावर सुद्धा त्याचा परिणाम दिसून आला. बीएसईनुसार, Zeel, Ideaforge, VMart, Avantel, Zentec हे शेअर वधारले. तर Astral, LTFoods, Siemens, Stltech, Mtartech कंपन्यांमध्ये विक्रीची लाट आली. गुंतवणूकदारांनी धडाधड शेअरची विक्री केली.
गेल्या आठवड्यात काय स्थिती?
शुक्रवारी 20 जून रोजी शेअर बाजारात जोरदार उसळी दिसून आली. सेन्सेक्स 1046 अंकांनी वधारून 82,408 आणि निफ्टी 319 अंकांनी वधारून 25,122 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्सच्या 30 पैकी 27 शेअर्समध्ये तेजी दिसली. त्यातील 3 शेअर घसरले. एअरटेल, नेस्ले आणि एमअँडएमचा शेअर 3.2 टक्क्यांनी वधारला. दुसरीकडे मारुती, अल्ट्राटेक सिमेंट आणि ॲक्सिस बँकच्या शेअरमध्ये घसरण आली. शुक्रवारी अडखळत का असेना बाजारात चमक दिसली होती.
जागतिक बाजारात काय स्थिती
पश्चिम आशियातील संघर्ष पेटल्याचा परिणाम जगातील अनेक शेअर बाजारांवर दिसून आला. गुंतवणूकदार या तणावामुळे हादरले आहेत. जपानमधील निक्केई घसरला. तर टॉपिक्स इंडेक्स 0.48 टक्के घसरला. दक्षिण कोरियातील इंडेक्स कोस्पीमध्ये 1.16 अंकांची घसरण दिसली. टेक-हेवी कोस्डॅकमध्ये 1.99 टक्क्यांची घसरण झाली. हाँगकाँगमधील हँग सँग इंडेक्सची सुरुवात सुद्धा अडखळतच झाली. त्यामुळे आज भारतीय शेअर बाजार सुद्धा लाल रंगात न्हाऊन निघण्याची शक्यता सकाळच्या पूर्व व्यापारी सत्रात वर्तवण्यात येत होती.