
Jalgaon Sarafa Market : सोने आणि चांदीत तुफान आले आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक दिवशी दोन्ही धातु मजल-दरमजल करत पुढे जात आहे. दोन्ही धातुच्या वेगाने ग्राहकाचा हिरमोड झाला आहे. ऐन सणासुदीत सोने सव्वालाखाकडे कूच करत असल्याने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पण आज दोन्ही धातुनी अचानक युटर्न घेतला. दोन्ही धातुत मोठी घसरण झाली. सोने घसरल्याने ग्राहकांना सुखद धक्का बसला. जळगावच्या सराफा बाजारात आज सोन्याचा दर घसरला.
सोन्यात मोठी घसरण
जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. गेल्या 24 तासात सोन्याच्या दरामध्ये तब्बल 1100 रुपयांनी घसरण झाली आहे. सोन्याचे दर विना जीएसटी 1 लाख 13 हजार 200 रुपयांवर आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने वाढ होत असलेल्या सोन्याच्या दरात घसरण झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
सोन्याचा भाव काय?
goodreturns.in नुसार, 24 सप्टेंबर रोजी 1 ग्रॅम 24 कॅरेट सोने 32 रुपयांनी घसरले होते. तर आज सकाळी सोने 93 रुपयांनी स्वस्त झाले. 10 ग्रॅममागे सोने गेल्या दोन दिवसात 1250 रुपयांनी स्वस्त झाले. 24 कॅरेट 1 ग्रॅम सोन्याचा भाव आज सकाळच्या सत्रात 11,459 रुपये तर 22 कॅरेट सोने 10,505 रुपये इतका आहे.
चांदी वधारली की स्वस्त?
22 सप्टेंबर रोजी 3000 रुपयांनी चांदी महागली. पण गेल्या दोन दिवसांपासून गुडरिटर्न्सनुसार किंमतीत बदल दिसला नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,40,000 रुपये इतका आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) सोने आणि चांदी घसरले. 24 कॅरेट सोने 1,13,230 रुपये, 23 कॅरेट 1,12,780, 22 कॅरेट सोने 1,03,720 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 84,920 रुपये, 14 कॅरेट सोने 66,61240 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 1,34,089 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
सोने-चांदीत महागाई कशामुळे?
सोन्याची किंमत धडाधड वाढत असल्याने ग्राहकांना धडकी बसली आहे जागतिक बाजारातील अस्थिरता, अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेची व्याजदर कपात आणि अजून या वर्षाअखेरीस व्याजदर कपातीचे संकेत यामुळे गुंतवणूकदार सोने-चांदीकडे वळाले आहेत. मागणी आणि पुरवठ्यातील व्यस्त प्रमाणामुळे किंमती भडकल्या आहेत. व्याज दर कमी झाल्याचे परिणाम थेट डॉलर आणि बाँडवर दिसत आहे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून या दोन्ही धातुकडे वळल्याने किंमती सातत्याने वाढत आहेत.