D Mart : डीमार्टमध्ये फक्त खरेदीच करायची नसते, वस्तू विकताही येतात; जाणून घ्या A To Z माहिती
डीमार्ट केवळ खरेदीसाठीच नव्हे, तर तुमच्या उत्पादनांना देशभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक मोठी संधी आहे. छोटे आणि मध्यम व्यावसायिक डीमार्टचे व्हेंडर होऊन आपला माल मोठ्या प्रमाणावर विकू शकतात.

D Mart : डीमार्ट म्हटलं की प्रत्येकाच्या डोळ्यांसमोर येतात स्वस्त दर, भरघोस आकर्षक ऑफर्स आणि महिन्याभराचे किराणा सामान एकाच ठिकाणी खरेदी करण्याची सोय. मात्र, अनेकांना यामागची एक महत्त्वाची गोष्ट माहीत नाही. डीमार्टमध्ये केवळ खरेदीच करता येत नाही, तर तुम्ही स्वतः तयार केलेली उत्पादनेही देशभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकता. म्हणजेच, स्वतःची उत्पादनं तयार करणाऱ्या छोट्या आणि मध्यम व्यावसायिकांसाठीही हे मोठ्या बाजारपेठेचे प्रवेशद्वार ठरू शकते. छोट्या व्यावसायिकांना मोठ्या बाजारपेठेपर्यंत पोहोचण्याची संधी देणाऱ्या या बिझनेस मॉडेलबद्दल जाणून घेऊया.
स्वतःचा व्यवसाय सुरू करून उत्पादनं तयार करणाऱ्या प्रत्येक व्यावसायिकाचं स्वप्न असतं की, त्यांचा माल मोठ्या प्रमाणावर विकला जावा. ग्रामीण भागात किंवा छोट्या शहरांमध्ये खाद्यपदार्थ, दैनंदिन वापराच्या वस्तू आणि घरगुती उपयोगाच्या वस्तू तयार करणारे अनेक छोटे उद्योग आहेत. मात्र, या व्यवसायांसमोर सर्वात मोठे आव्हान असतं ते मार्केटिंगचं. केवळ आसपासच्या दुकानांमध्ये ती उत्पादनं विकल्यास व्यवसायाचा विस्तार मर्यादित राहू शकतो. पण तुमची उत्पादनं ही देशभरातील शेकडो स्टोअर्स असलेल्या डीमार्टसारख्या मोठ्या रिटेल साखळीत विकली गेली तर? यामुळे विक्रीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढू शकतं.
डीमार्ट स्वतःची स्टोअर फ्रँचायझी देत नाही. मात्र, छोट्या आणि स्थानिक उत्पादकांना व्हेंडर म्हणून जोडून घेण्यासाठी संधी उपलब्ध करून देते.
डीमार्टच्या शेल्फवर तुमचे उत्पादन पोहोचण्यासाठी काय आवश्यक ?
डीमार्टच्या ग्राहकांना चांगल्या गुणवत्तेसोबतच वाजवी किमतीत उत्पादने अपेक्षित असतात. त्यामुळे तुमचे उत्पादन स्टोअरमध्ये ठेवण्यासाठी खालील बाबी महत्त्वाच्या ठरू शकतात.
1. किंमत आणि गुणवत्तेचा समतोल
ब्रँडेड उत्पादनांच्या तुलनेत गुणवत्ता चांगली किंवा समकक्ष असण्यासोबतच उत्पादनाची किंमत सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्यात असणे आवश्यक आहे.
2. दर्जेदार आणि आकर्षक पॅकेजिंग
उत्पादनाची वाहतूक करताना ते खराब होणार नाही, तसेच ग्राहकांचं लक्ष वेधून घेईल, अशा दर्जेदार आणि आकर्षक पॅकेजिंगचा वापर करणं महत्त्वाचे आहे.
3. सातत्याने पुरवठा करण्याची क्षमता
मोठ्या रिटेल चॅनेलमध्ये उत्पादन दाखल झाल्यानंतर मागणी वाढू शकते. त्यामुळे अचानक वाढलेल्या ऑर्डर्स पूर्ण करण्यासाठी पुरेशी उत्पादन क्षमता आणि नियमित पुरवठ्याची क्षमता आणि व्यवस्था असणं आवश्यक आहे.
व्यवसायासाठी कोणती महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक ?
तुमच्या उत्पादनाच्या प्रकारानुसार विविध नोंदणी आणि प्रमाणपत्रांची आवश्यकता असू शकते.
– GST नोंदणी आणि व्यवसायाचा PAN क्रमांक
– लोणची, पापड, मसाले, पीठ यांसारख्या खाद्यपदार्थांसाठी आवश्यक FSSAI नोंदणी/परवाना
– इतर प्रकारच्या उत्पादनांसाठी आवश्यकतेनुसार संबंधित सरकारी चाचणी प्रमाणपत्रं किंवा BIS प्रमाणपत्रं
– छोट्या उद्योगांसाठी केंद्र सरकारचं Udyam Registration Certificate असल्यास त्याचा उपयोग होऊ शकतो.
याशिवाय, उत्पादनाच्या श्रेणीनुसार इतर परवाने किंवा कागदपत्रांचीही आवश्यकता असू शकते.
डीमार्टसोबत व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो का ?
डीमार्टसारख्या मोठ्या रिटेल नेटवर्क सोबत काम करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे मोठ्या ग्राहकवर्गापर्यंत पोहोचण्याची संधी. प्रत्येक उत्पादनावर मिळणाऱ्या मार्जिनपेक्षा मोठ्या प्रमाणात होणारी विक्री व्यवसायाच्या वाढीसाठी महत्त्वाची ठरू शकते.
स्थानिक पातळीवर महिन्याला काहीशे युनिट्स विकणाऱ्या व्यवसायाला मोठ्या रिटेल नेटवर्कमधून अधिक प्रमाणात विक्री करण्याची संधी मिळू शकते. यामुळे उत्पादनाची बाजारपेठ वाढण्यास आणि व्यवसायाला ब्रँड म्हणून ओळख निर्माण करण्यास मदत होऊ शकते.
डीमार्टमध्ये उत्पादन विकण्यासाठी अर्ज कसा करायचा?
कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन “Partner With Us” या विभागातून आपल्या उत्पादनांची आणि व्यवसायाची माहिती सादर करता येते. यामध्ये उत्पादनाची श्रेणी, कंपनीची माहिती आणि उत्पादनांचा कॅटलॉग यांसारखे तपशील द्यावे लागू शकतात.
अर्जानंतर कंपनीकडून उत्पादनांचे नमुने आणि गुणवत्तेचे निकष तपासले जाऊ शकतात. उत्पादन आवश्यक निकषांमध्ये बसल्यास पुढील व्यावसायिक चर्चा आणि पुरवठा कराराची प्रक्रिया होऊ शकते.
टीप: प्रत्यक्षात कोणती कागदपत्रे, प्रमाणपत्रे, किंमत, पुरवठ्याच्या अटी आणि व्हेंडर म्हणून निवड होण्याचे निकष लागू होतील, हे उत्पादनाच्या प्रकारानुसार आणि कंपनीच्या सध्याच्या प्रक्रियेनुसार बदलू शकतात.
(डिस्क्लेमर : वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही प्राथमिक स्वरूपाची आहे. ती उपलब्ध स्रोतांवरून देण्यात आलेली आहे. या वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)