
मुंबई | 1 ऑक्टोबर 2023 : एकीकडे संपूर्ण महिनाभर मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धूम सुरू होती. तर दुसरीकडे मुंबईत मोठ्या प्रमाणावर मालमत्तेची खरेदी झाली. ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर मालमत्ता खरेदीची लयलूट केली. इतकी की गेल्यावर्षीचा विक्रमच ग्राहकांनी मोडून टाकला. मोठ्या प्रमाणावर मालमत्तांची खरेदी झाल्याने महाराष्ट्र सरकारनेही गलेलठ्ठ कमाई केली आहे. सरकारला स्टॅम्प ड्युटीतून एक दोन नव्हे तर 1,124 कोटी रुपयांचं उत्पन्न झालं आहे.
सप्टेंबर महिन्यात मुंबईत मालमत्ता नोंदणी आणि मुद्रांक शुल्क कलेक्शन मोठ्या प्रमाणावर झाले आहे. त्यामुळे मालमत्ता खरेदीच्या बाबत सप्टेंबर महिना अत्यंत चांगला राहिला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 23 टक्के अधिक मालमत्तांची विक्री झाली आहे. तर मुद्रांक शुल्क कलेक्शनमध्ये 53 टक्क्याने वाढ झाली आहे.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. तसेच मुंबई हे देशातील सर्वात एक्सपेन्सिव्ह मार्केट आहे. मुंभईत सप्टेंबर महिन्यात 10,602 मालमत्तांची नोंदणी झाली आहे. या मालमत्तांवर मुद्रांक शुल्कातून सरकारने 1,124 कोटीचे उत्पन्न मिळवलं होतं. राज्य सरकारच्या इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशनने दिली आहे.
सप्टेंर महिन्यास साधरणपणे गणेशोत्सव असतो. मुंबईत गणेशोत्सव अत्यंत जल्लोषात साजरा केला जातो. गणेशोत्सवाच्या काळात मालमत्ता विकत घेणं लोक शुभ मानतात. त्यामुळे या काळात मोठ्या प्रमाणावर मालमत्तांमध्ये गुंतवणूक केली जाते. गणेशोत्सवात नागरिकांनी मालमत्तेत विक्रमी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे आता दसरा, नवरात्र आणि दिवाळी सण तोंडावर आला आहे. त्यामुळे लोक या काळात मोठ्या प्रमाणावर मालमत्तांमध्ये गुंतवणूक करतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.
सप्टेंबर महिन्यात मुंबईत नोंदणी झालेल्या मालमत्तेत 82 टक्के मालमत्ता या निवासी आहेत. तर 18 टक्के मालमत्ता या व्यावसायिक आहेत, तसेच इतर कॅटेगिरीतीलही आहेत. मुंबईतील रेसिडेन्शिअल मार्केटमध्ये जबरदस्त वाढ आहे. हा सेममेंट 10,000 प्रॉपर्टींच्या मार्कला क्रॉस करत आहे. 2023च्या सुरुवातीला 9 महिन्यात रेसिडेन्शिअल प्रॉपर्टी बुकिंगची महिन्याची सरासरी 10.433 यूनिट होती. यातील बहुतेक मालमत्ता या एक कोटींहून अधिक मूल्य असलेल्या होत्या, अशी माहिती प्रॉपर्टी कन्सल्टंट नाइट फ्रँक इंडियाचे सीएमडी शिशीर बैजल यांनी दिली आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये एक कोटींपेक्षा अधिक किंमतीच्या मालमत्तांच्या विक्रीत वाढ झाली आहे. जानेवारी-सप्टेंबर 2023 दरम्यान याची विक्री 57 टक्के होती. जानेवारी-सप्टेंबर 2020 मध्ये हा आकडा 49 टक्के होता.