
तुम्ही कधी विचार केला आहे का की एखाद्याचा मृत्यू झाला तर म्युच्युअल फंडाचे काय होते? पैसे तसे अडकून पडतात की कुटुंबीय सहज दावा करू शकतात? नॉमिनी झाल्याने काम लवकर होते की कायदेशीर प्रक्रियेत अडकून पडते?
तुमच्या कुटुंबातील कोणाकडे म्युच्युअल फंड असतील किंवा तुम्ही स्वत: गुंतवणूक केली असेल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. येथे आम्ही गुंतवणूकदाराच्या मृत्यूनंतर म्युच्युअल फंडावर कोण दावा करू शकतो, प्रक्रिया काय आहे, कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत आणि करासंदर्भात आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे सांगणार आहोत.
म्युच्युअल फंडावर दावा करण्याचा कुणाला अधिकार?
म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यानंतर गुंतवणूकदारांनीही त्यांच्या अनुपस्थितीत आपला पैसा योग्य हातापर्यंत पोहोचेल याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी म्युच्युअल फंड कुणाला आणि कसा हस्तांतरित केला जातो, हे जाणून घेणं गरजेचं आहे. म्युच्युअल फंड संयुक्त खात्यात असेल आणि पहिल्या धारकाचा मृत्यू अपडेट असेल तर ती गुंतवणूक आपोआप उर्वरित धारकांकडे हस्तांतरित होते. पण जर सर्व खातेदारांचा मृत्यू झाला आणि एखादा नॉमिनी असेल तर तो निधी त्या नॉमिनीला ट्रान्सफर केला जातो. नॉमिनी नसेल तर ही गुंतवणूक कायदेशीर वारसांकडे हस्तांतरित केली जाते. त्याचबरोबर खाते एका व्यक्तीच्या नावावर असेल तर तो निधी नॉमिनीला दिला जाईल. नॉमिनी नसल्यास कायदेशीर वारस या निधीसाठी पात्र असतील. एकापेक्षा जास्त नॉमिनी किंवा वारस असल्यास नॉमिनेशन डॉक्युमेंटमध्ये दिलेल्या भागानुसार गुंतवणुकीची विभागणी केली जाईल.
म्युच्युअल फंडाचा दावा करण्यासाठी सर्वप्रथम संबंधित फंड हाऊसशी संपर्क साधावा लागेल. नॉमिनी, जॉइंट अकाउंट होल्डर किंवा कायदेशीर वारसदार यांनी ज्या म्युच्युअल फंड कंपनीत मृतव्यक्तीने गुंतवणूक केली होती, त्या कंपनीशी बोलले पाहिजे. यानंतर आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात. जसे ट्रान्समिशन रिक्वेस्ट फॉर्म, मृत व्यक्तीचा मृत्यू दाखला, दावादाराचे आधार आणि पॅनकार्ड, बँक तपशील.
कायदेशीर वारसदार दावा करत असल्यास, त्यांना नुकसान भरपाई रोखे, वैयक्तिक प्रतिज्ञापत्र आणि वैध इच्छापत्र किंवा वारसा प्रमाणपत्र देखील आवश्यक आहे. नॉमिनी अल्पवयीन असेल तर त्याचा जन्म दाखला आणि पालकांची केवायसी कागदपत्रेही सादर करावी लागतात.
कराच्या बाबतीत म्युच्युअल फंड हस्तांतरणावर भांडवली नफा कर आकारला जात नाही. परंतु नंतर ती युनिट्स विकली गेली किंवा लाभांश मिळाला तर त्यांच्यावर कर आकारला जाऊ शकतो. त्यामुळे गुंतवणूक करताना नॉमिनीची माहिती योग्य ठेवणे आणि कुटुंबाला गुंतवणुकीचा तपशील सांगणे अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून त्यांना भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही आणि त्यांचे आर्थिक भवितव्य सुरक्षित राहील.
(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)