Success Story : जे लोकांना डोकेदुखी वाटत होती, त्यातूनच 4 वर्षात जोडप्याने उभा केला 1 कोटींचा व्यवसाय, 1000 शेतकऱ्यांना दिला रोजगार
एका जोडप्याने असा एक व्यवसाय सुरू केला ज्यामधून त्यांनी 4 वर्षात कोट्यावधींची उलाढाल केली. यासोबतच शेतकऱ्यांना देखील रोजगार मिळवून दिला, जाणून घ्या त्यांनी असा कोणता बिझनेस केला

शेतात केळीचं पीक घेतलं की फळांची काढणी झाल्यानंतर मोठे खोड शिल्लक राहते. आता या खोडांचं करायचं काय असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांसमोर राहतो. काही जण ते मुळासकट काढून टाकतात तर काही जण ते जाळून टाकतात. पण एका जोडप्याला यातूनच एक भन्नाट कल्पना सुचली आणि त्यातूनच ते आज कोटींची उलाढाल करत आहेत.
शेतकऱ्यांची अडचण पाहून सुचली कल्पना
ओडिशातील खोर्धा जिल्ह्यातील काशीनाथ जेना यांनी जेव्हा गावाला भेट दिली. तेव्हा त्यांना तिथल्या एका समस्येची जाणीव झाली आणि त्यातूनच व्यवसायाची कल्पना उभी राहिली. गावात फेरफटका मारताना त्यांच्या लक्षात आलं की फळांची काढणी झाल्यानंतर उरलेल्या खोडांची विल्हेवाट लावणं शेतकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी असायची हीच अडचण काशीनाथ यांनी हेरली.
केळीच्या खोडापासून काय काय तयार करता येऊ शकतं. याचा त्यांनी सखोल अभ्यास केला. वेगवेगळ्या राज्यांना भेटी दिल्या. केळीच्या खोडातून धागा बनवता येतो, त्याचबरोबर खोडाच्या आतील भागाचा खाद्यपदार्थ बनवण्यासाठी वापर करता येतोय असं त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांची पत्नीही या व्यवसायात जोडली गेली.
केळीच्या कचऱ्यापासून 100 हून अधिक उत्पादने
2021 मध्ये जोडप्याने ‘जयदेव बनाना फार्मर्स अँड आर्टिसन्स असोसिएशन ची स्थापना केली. शेतकऱ्यांना सोबत घेऊन हा व्यवसाय सुरू केला तो आता मोठ्या प्रमाणात लोकांना रोजगार देत आहे. 300 टन सालींवर प्रक्रिया करून केळीच्या सालीपासून आता 100 हून अधिक प्रकारची उत्पादने तयार केली जातात.
केळीच्या खोडाच्या आतील मऊ भागापासून लोणचं, रस आणि मुरंबा तयार केला जातो. तर बाहेरील थरांमधून नैसर्गिक धागा तयार केला जातो. या धाग्यापासून पिशव्या, चटई, मोठे दोरं, कोस्टर आणि विविध हस्तकलेच्या वस्तू बनवल्या जातात. एवढंच नाही तर प्रक्रिया केलेल्या भागावर सेंद्रिय खत तयार केलं जातं.
एक कोटींची उलाढाल, आता 10 कोटींचे लक्ष्य
या व्यवसायाचा फायदा केवळ जेना जोडप्यालाच झाला नाही, तर परिसरातील शेतकऱ्यांनाही त्यातून कमाईचा मार्ग मिळाला आहे. 1000 कुटुंबाशी जोडलेला हा व्यवसाय आता 3000 शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. आर्थिक वर्ष 2024 – 2025 मध्ये संस्थेची उलाढाल 1 कोटी रूपयांपर्यंत पोहोचली आहे. आता 2030 पर्यंत ही उलाढाल 10 कोटी रूपयांपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट आहे.