पेट्रोल तब्बल 6 रुपयांनी स्वस्त होण्याची चिन्हं, कारण…

| Updated on: Mar 09, 2020 | 6:15 PM

जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत 30 टक्क्यांनी (Petrol-Diesel price may decrease) घट झाली आहे. त्यामुळे भारतात पेट्रोल-डिझेल प्रती लिटर तब्बल 6 रुपयांनी स्वस्त होण्याची चिन्हं आहेत.

पेट्रोल तब्बल 6 रुपयांनी स्वस्त होण्याची चिन्हं, कारण...
Follow us on

नवी दिल्ली : जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत 30 टक्क्यांनी (Petrol-Diesel price may decrease) घट झाली आहे. त्यामुळे भारतात पेट्रोल-डिझेल प्रती लिटर तब्बल 6 रुपयांनी स्वस्त होण्याची चिन्हं आहेत. कच्च्या तेलाच्या उत्पादनात घट करण्यावरुन सौदी अरेबिया आणि रशिया यांच्यात सुरु असलेल्या मतभेदामुळे पेट्रोल स्वस्त होणार आहे (Petrol-Diesel price may decrease). यासोबतच कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातल्यामुळेदेखील त्याचा फटका कच्च्या तेलाच्या बाजारपेठेला बसत आहे.

सौदी अरेबिया आणि रशिया वादाचा फायदा भारताला

सौदी अरेबिया आणि रशिया हे कच्च्या तेलाची निर्यात करणारे सर्वात मोठे देश मानले जातात. मात्र, कच्च्या तेलाच्या उत्पादनात घट करण्यावरुन त्यांच्यात मतभेद आहेत. कच्च्या तेलाची निर्यात करणाऱ्या देशांच्या ओपेक संघटनेची उत्पादनाच्या घटाबाबत एक बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत रशिया आणि सौदी अरेबिया यांच्यात एकमत न झाल्याने कच्च्या तेलाचे दर घसरले.

कोरोना व्हायरसमुळे इंधनाची मागणी कमी होईल. त्यामुळे उत्पादन कमी करावं, अशी ओपेकच्या बैठकीत चर्चा सुरु होती. मात्र, या मुद्द्याला रशियाची सहमती नव्हती. त्यामुळे या बैठकीत सौदी अरेबिया आणि रशिया यांच्यात एकमत होऊ शकलं नाही. त्याचा फटका कच्चा तेलाच्या बाजारपेठाला बसण्याची शक्यता आहे.

सौदी अरेबिया आणि रशिया दोघांमध्ये कच्च्या तेलाच्या किंमतीवरुन स्पर्धा रंगण्याची शक्यता आहे. भारत हा कच्च्या तेलांची आयात करणारा मोठा देश आहे. कच्च्या तेलांच्या किंमतीत घट झाल्याची स्पर्धा रंगल्यास त्याचा भारताला फायदा होणार आहे. ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय व्यापार विश्लेषक अरुण केजरीवाल यांच्या मते, कच्चा तेलाच्या किंमतीवरुन स्पर्धा रंगल्यास भारतात पेट्रोल-डिझेलचे दर प्रती लिटर 6 रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – बिहारच्या राजकारणात नव्या पक्षाची उडी, लंडनमधून तरुणीचा मुख्यमंत्रिपदावर दावा

तब्बल 19 वर्षांनंतर पहिल्यांदाच पेट्रोल स्वस्त

याअगोदर 1991 साली कच्च्या तेलाची किंमत कमी झाली होती. आता 19 वर्षांनंतर कच्च्या तेलाची किंमत घसरली आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाची किंमतीत 14.25 डॉलरने घट झाली आहे. त्यामुळे कच्च्या तेलाची किंमत 31.02 डॉलर प्रती बॅरलवर पोहोचली आहे. ही घट 31.5 टक्क्यांची आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीत 19 वर्षांअगोदर म्हणजे 17 जानेवारी 1991 रोजी एवढी मोठी घट झाली होती. त्यावेळी आखाती देशांतील खाडी युद्धामुळे ती घट झाली होती.

पेट्रोल दरवाढीमागचा सर्वात मोठा व्हिलन ‘ओपेक’ कोण?

ओपेक ही इंधन निर्यात करणाऱ्या देशांची संघटना असून या संघटनेचं मुख्यालय ऑस्ट्रिया देशाची राजधानी व्हिएन्नामध्ये आहे. ऑस्ट्रियाचा ओपेक देशांमध्ये समावेश नसला तरी मुख्यालय मात्र व्हिएन्नामध्ये आहे. 15 देश असलेल्या या संघटनेकडून तेलांच्या किंमतीत मोठी कमाई केली जाते. सौदी अरेबिया या देशांचा प्रमुख मानला जातो. जगातली 44 टक्के तेल निर्मिती ओपेक देशांकडून केली जाते, तर  जगातील 81.5 टक्के तेल साठा या देशांकडे आहे.

अल्जेरिया, अँगोला, इक्वेडोर, इक्वेटोरियल गयाना, गॅबन, इराण, इराक, कुवैत, लिबिया, नायजेरिया, कतार, रिपब्लिक ऑफ काँगो, संयुक्त अरब अमिरात आणि स्वयंघोषित प्रमुख असलेल्या सौदी अरेबियाचा या ग्रुपमध्ये समावेश आहे. व्हेनेझुएला आणि इंडोनेशियाचाही या ग्रुपमध्ये समावेश होता, पण त्यांनी नंतर बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. शिवाय कुवैतही लवकरच यामधून बाहेर पडणार आहे.

तेल ही जगाची गरज आहे आणि प्रमुख राष्ट्र तेल आयातीवर अवलंबून आहेत. त्यामुळे या संघटनेकडून मोठ्या प्रमाणात कमाई केली जाते. कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्या की हे ओपेक देश लगेच तेल निर्मिती कमी करतात, जेणेकरुन स्वतःला तोटा होणार नाही.