Plastic Notes: मोठी आनंदवार्ता! 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा लवकरच तुमच्या खिशात, फिल्ड ट्रायलला RBI ची मंजूरी
RBI Polymer Banknotes: गेल्या काही दिवसांपासून प्लास्टिक नोटांविषयी अनेक बातम्या समोर येत आहे. RBI ने सरकारसमोर प्लास्टिक नोट छापण्याविषयीचा प्रस्ताव ठेवला होता. त्याला केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे. देशात प्लास्टिकच्या एक अब्ज नोटा छापण्यात येणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून प्लास्टिक नोटांविषयी बाजारात मोठी चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा छापण्याचे वृत्त समोर आले होते. केंद्र सरकारने संसदेत याविषयी महत्त्वाची माहिती दिली. त्यानुसार, 10 आणि 20 रुपयांच्या 1 अब्ज म्हणजे 100 कोटी पॉलिमर बँकनोटस छापण्याच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली आहे. अर्थमंत्र्यांनी राज्यसभेत ही माहिती दिली. त्यानुसार, भारतीय रिझर्व्ह बँकेला केंद्रीय बोर्डाच्या शिफारशींच्या आधारे RBI अधिनियम, 1934 चे कलम 25 अंतर्गत ही मंजूरी देण्यात आली आहे.
प्लास्टिक नोटांची ट्रायल
सरकारने 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा बाजारात उतरण्यापूर्वी त्यांच्या ट्रायलला मंजूरी दिली आहे. त्यातंर्गत या दोन्ही चलनाच्या 100-100 कोटी पॉलिमर नोट तयार करण्यात येतील. मंगळवारी राज्यसभेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ही लिखित माहिती दिली. कागदी नोटा लागलीच परत घेतल्या जाणार नाही. तर त्या नोटांसोबतच प्लास्टिक नोट प्रचलनात येतील. व्यवहारात वापरल्या जातील. त्यामुळे नोटा बदलांची कवायत करावी लागणार नाही. प्लास्टिक नोटा नियमित व्यवहारात आणल्या जातील. नोटा छपाईची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या नोटा कधी बाजारात येतील याची माहिती सरकारने वा केंद्रीय बँकेने अद्याप दिलेली नाही.
पॉलिमर नोट ही दीर्घकाळ टिकाऊ
सामान्य प्लास्टिकपेक्षा नवीन नोटांचे पॉलिमर वेगळे असते. ही पॉलिमर शीट मिळवणे आणि तिचे उत्पादन करणे अत्यंत कठीण असते यामुळे बनावट नोटा तयार करणे सोपे नाही. या नोटेमध्ये बायॲक्सियली ओरिएंटेड पॉलिप्रॉपिलीनचा (Biaxially Oriented Polypropylene) वापर करण्यात येतो. परिणामी पॉलिमर नोट दीर्घकाळ टिकते. ही साधारण नोटांपेक्षा तुलनेत 2.5 ते 4 पट अधिक चालते. पॉलिमर नोट पाणी, घाम, तेल वा धुळीने खराब होत नाही वा ती फाटत नाही. पण त्यासाठी मोठा खर्च लागतो. कागदी नोटांपेक्षा प्लास्टिक नोटांचे आयुष्य हे 6 पट अधिक असल्याचे मानले जाते. गेल्या वर्षी आरबीआयने 8,270 कोटी नवीन कागदी नोटा बाजारात आणल्या होत्या. तर 6,213 कोटी जुन्या नोटा नष्ट केल्या होत्या.
प्लास्टिक नोटांसाठी तीन हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. प्लास्टिक नोटा छापण्यासाठी, कागदी नोटांपेक्षा 30%-60% अधिकचा खर्च अपेक्षित आहे. पण त्यांचे आयुष्यमान अधिक असल्याने नोटा छपाईचा खर्च वाचणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.
जगातील 60 देशात प्लास्टिक नोटा व्यवहारात
आज जगातील जवळपास 60 देश प्लास्टिक नोटा वापरल्या जातात. 1988 मध्ये ऑस्ट्रेलियाने जगात पहिल्यांदा 10 डॉलरची प्लास्टिक नोट बाजारात आणली होती. सिंगापुर, इंडोनेशिया, थायलंड, मलेशियासह अनेक देशात प्लास्टिकच्या नोटा चलनात आल्या. युरोपमध्ये रोमानियाने 1998 मध्ये पहिल्यांदा प्लास्टिक नोटेचा वापर केला. कॅनडामध्ये 2011 मध्ये पॉलिमर नोटा चलनात आल्या. अमेरिकेत डॉलर पूर्णपणे प्लास्टिकचा नाही, तर काही नोटा या कॉटन-लिननच्या आहेत. आता भारतही या देशांच्या रांगेत उभा राहणार आहे.