प्लास्टिकच्या नोटा बाजारात कधी येणार? RBI ने थेट तारीख सांगितली
Polymer Notes : RBI ने 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटांच्या फील्ड ट्रायलला मंजूरी दिली आहे. त्यामुळे आता या नोटा बाजारात कधी येणार यावर RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी भाष्य केले आहे.

आगामी काळात प्लास्टिकच्या चलनी नोटा बाजारात येणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटांच्या फील्ड ट्रायलला मंजूरी दिली आहे. त्यामुळे आता या नोटा बाजारात कधी येणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. अशातच आता यावर मोठी अपडेट समोर आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी म्हटले की, सर्व काही नियोजनानुसार झाले तर पुढील आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला आरबीआय पॉलिमर (प्लास्टिक) नोटा चलनात आणण्याची तयारी करत आहे.
पॉलिमर नोटा बाजारात कधी येणार?
आज MPC मीटिंगनंतर बोलताना गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले की, ‘अनेक देशांमध्ये पॉलिमर नोटा 30 वर्षांहून अधिक काळ यशस्वीपणे वापरल्या जात आहेत. कमी मूल्याच्या नोटांसाठी या अधिक उपयुक्त ठरतील, कारण अशा नोटांचा वापर आणि हातोहात व्यवहार अधिक असल्याने त्या लवकर खराब होतात. पॉलिमर साहित्याच्या खरेदीसाठी सध्या निविदा मागवण्यात आल्या आहेत. त्यानंतर विविध चाचण्या घेतल्या जातील आणि आवश्यक सुरक्षा मंजुरी मिळवली जाईल. त्यानंतर योग्य वेळी याबाबत नागरिकांना सविस्तर माहिती दिली जाईल. सर्व प्रक्रिया नियोजनानुसार पार पडल्यास पुढील आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला या नोटा चलनात आणण्याचे आमचे लक्ष्य आहे.’
पॉलिमर नोटा बाजारात आणण्यामागचा उद्देश काय?
संजय मल्होत्रा यांनी सांगितले की, पॉलिमर नोटा आणण्यामागे दोन प्रमुख उद्दिष्टे आहेत. पहिले म्हणजे नोटांचे आयुष्य वाढवणे. कारण कमी मूल्याच्या नोटा वारंवार वापरल्या जात असल्याने त्या लवकर झिजतात. पॉलिमर नोटा कागदी नोटांपेक्षा तीन ते चार पट अधिक काळ टिकतात त्यामुळे अशा नोटा फायदेशीर ठरतील. दुसरे कारण म्हणजे चलन छपाईची क्षमता वाढवणे हे आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा विस्तार होत असल्याने चलननिर्मितीची क्षमता वाढवणे आवश्यक आहे. पॉलिमर नोटांमुळे हे उद्दिष्ट साध्य होण्यास मदत होईल.
पॉलिमर नोटा कशा असतात?
पॉलिमर नोटा या विशेष प्रकारच्या प्लास्टिकसदृश कृत्रिम (सिंथेटिक) पदार्थापासून तयार केल्या जातात. मजबूत आणि लवचिक प्लास्टिक फिल्मवर या नोटांची छपाई केली जाते. त्यामुळे त्या कागदी नोटांपेक्षा अधिक टिकाऊ असतात आणि सहज फाटत किंवा खराब होत नाहीत. आगामी काळात सरकारकडून 2 अब्ज प्लास्टिक नोटा छापल्या जाणार आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर या नोटांचा वापर टप्प्याटप्प्याने देशभरात वाढवला जाणार आहे.