‘सेमी’कंडक्टर तुटवड्याचा ‘फूल्ल’ परिणाम, उत्पादनात घट; वाहन उद्योग संकटात

| Updated on: Mar 11, 2022 | 7:02 PM

सेमीकंडक्टरचा तुटवडा (Semiconductor Crisis) आणि पुरवठा साखळीतील समस्यांमुळे वाहन क्षेत्रात उत्पादन आणि विक्रीत मोठी घसरण नोंदविली गेली. नवीन नियमांमुळे वाहन क्षेत्रात किंमतीत मोठी वाढ नोंदविली गेली आहे

‘सेमी’कंडक्टर तुटवड्याचा ‘फूल्ल’ परिणाम, उत्पादनात घट; वाहन उद्योग संकटात
Semi conduct
Image Credit source: TV9
Follow us on

नवी दिल्लीः वाहन क्षेत्राची (AUTO SECTOR) फेब्रुवारी महिन्यात निराशाजनक कामगिरी राहिली. सेमीकंडक्टरचा तुटवडा (Semiconductor Crisis) आणि पुरवठा साखळीतील समस्यांमुळे वाहन क्षेत्रात उत्पादन आणि विक्रीत मोठी घसरण नोंदविली गेली. नवीन नियमांमुळे वाहन क्षेत्रात किंमतीत मोठी वाढ नोंदविली गेली आहे. वाहन उद्योगावार थेट परिणाम दिसून आला आहे. वाहन उत्पादित कंपन्यांची शिखर संस्था सियामने (SIAM) सद्यस्थितीमधील वाहन उद्योगाचा अहवाल सादर केला आहे. सियामच्या अहवालानुसार वाहन उत्पादक कंपन्यांकडून डीलरला पुरवठा केल्या जाणाऱ्या गाड्यांच्या संख्येत घट झाली आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यात वाहनांच्या अपेक्षित पुरवठ्यात तब्बल 23 टक्के घट नोंदविली गेली. फेब्रवारी 2022 मध्ये एकूण प्रवाशी वाहने, दोन चाकी आणि तीन चाकी वाहनांची ठोक विक्री 13,28,027 होती. गेल्या वर्षी समान महिन्यात 17,35,909 वर आकडा पोहोचला होता.

सियामच्या अहवालाची ठळक वैशिष्ट्ये ‘पॉईंट टू पॉईंट’:-

• फेब्रुवारी महिन्यात वाहनांच्या एकूण विक्रीत 17.8 टक्क्यांची घसरण
• संख्यात्मक विचार केल्यास एकूण 17.91 लाख यूनिट वाहनांची विक्री
• प्रवासी वाहनांच्या विक्रीत 6.3 टक्के घट, 1.67 लाख यूनिट वाहन विक्री
• दुचाकी वाहनांची विक्रीत 27 टक्के घट, वाहन विक्रीचा आकडा-10,37,994
• तीन चाकी वाहनांच्या विक्रीचा आकडा 27,039 वर पोहोचला.

निर्मिती खर्चात वाढ-

सियामचे महासंचालक राजेश मेनन यांनी सेमीकंडक्टर तुटवड्यामुळं वाहन निर्मिती खर्चात वाढ झाल्याचं म्हटलं आहे नवीन नियमांमुळे वाहनांच्या किंमती आणि लॉजिस्टिक खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाढत्या उत्पादन खर्चाचा थेट परिणाम विक्रीवर देखील दिसून आला आहे. गेल्या महिन्यांत सर्व प्रकारच्या वाहनांच्या विक्रीत तब्बल 20 टक्क्यांनी घट नोंदविली गेली आहे. फेब्रुवारी महिन्यात प्रवासी वाहन, तीन चाकी, दोन चाकी वाहनांचे एकत्रित उत्पादन 17,95,514 वर पोहोचले आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात 22,53,241 वाहनांचे उत्पादन झाले होते.

‘सेमी’तुटवड्याचा ‘लार्ज’ इफेक्ट:

सेमीकंडक्टरचा तुटवडा संपूर्ण जगाला भेडसावतो आहे. मोठमोठे प्रकल्प सेमीकंडक्टर वेळेवर मिळत नसल्याने थंडावले आहेत. विविध निर्मिती कंपन्यांची पानं सेमीकंडक्टर शिवाय हलत नाही. सेमीकंडक्टर उत्पादनासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. भारताला भविष्यातील सेमीकंडक्टर हब तयार करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. वेदांत ग्रुपचे प्रमुख अनिल अग्रवाल यांनी सेमीकंडक्टर समस्येवर उपाययोजना करण्यासाठी त्यांची कंपनी येत्या तीन वर्षांमध्ये 60 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली होती.

संबंधित बातम्या