Sovereign Gold Bond Scheme: सोनं स्वस्तात खरेदी करण्याची संधी; सॉवरेन गोल्ड बॉन्डच्या विक्रीला आजपासून सुरुवात

| Updated on: Jul 12, 2021 | 11:54 AM

Gold | रिझर्व्ह बँकेने या सिरीजसाठी प्रतिग्रॅम इश्यू प्राईस 4,807 रुपये इतकी निश्चित केली आहे. सॉवरेन गोल्ड बॉन्डमध्ये ऑनलाईन गुंतवणूक केल्यास तुम्हाला प्रतिग्रॅम सोन्यापाठी 50 रुपयांची सूट मिळेल.

Sovereign Gold Bond Scheme: सोनं स्वस्तात खरेदी करण्याची संधी; सॉवरेन गोल्ड बॉन्डच्या विक्रीला आजपासून सुरुवात
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

मुंबई: Sovereign Gold Bond Scheme चे सबस्क्रिप्शन सोमवारपासून ग्राहकांसाठी खुले होणार आहे. हे बाँडस सोन्यातील गुंतवणुकीचा अत्यंत सुरक्षित पर्याय मानला जातो. अगदी एक ग्रॅमपासूनही या बाँडसमध्ये गुंतवणूक करता येते. प्रत्यक्षात घरातील तिजोरी किंवा बँकेच्या लॉकरमध्ये सोने (Gold) ठेवण्याची जोखीम पत्कारण्यापेक्षा सॉवरेन गोल्ड बॉन्ड हा तुलनेत सुरक्षित पर्याय समजला जातो. (Sovereign Gold Bond Scheme 22 series subscription will oepn between 12 to 16 July)

रिझर्व्ह बँकेने या सिरीजसाठी प्रतिग्रॅम इश्यू प्राईस 4,807 रुपये इतकी निश्चित केली आहे. सॉवरेन गोल्ड बॉन्डमध्ये ऑनलाईन गुंतवणूक केल्यास तुम्हाला प्रतिग्रॅम सोन्यापाठी 50 रुपयांची सूट मिळेल. ऑनलाईन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी गोल्‍ड बॉन्‍डचा भाव प्रतिग्रॅम 4757 इतका आहे. सध्या सोने-चांदीचा दर हा सामान्यांच्या आवाक्यापलीकडे गेला आहे. त्यामुळे सोने खरेदीचे (Gold) नाव काढले की अनेकांच्या पोटात गोळा येतो. मात्र, आता एका सरकारी योजनेच्या माध्यमातून सोनं स्वस्तात खरेदी करण्याची संधी चालून आली आहे.

यापूर्वी 31 मे ते 4 जून या कालावधीत Sovereign Gold Bond Scheme चे सबस्क्रिप्शन खुल झाले होते. त्यावेळी प्रतिग्रॅम सोन्याची किंमत 4,889 रुपये इतकी होती. या गोल्ड बाँडसवर गुंतवणुकदारांना वर्षाला 2.5 टक्के व्याज मिळेल. Sovereign Gold Bond Scheme चा कालावधी आठ वर्षांचा असतो. मात्र, पाच वर्षानंतर तुम्ही या योजनेतून बाहेर पडू शकता. यामध्ये तुम्हाला अगदी एक ग्रॅम सोन्यापासूनही गुंतवणूक करता येते. तसेच या बाँडसवर कर्जही दिले जाते.

वेळोवेळी योजनेत गुंतवणुकीची संधी

सोन्यात गुंतवणूक आणि पारदर्शकता वाढविण्यासाठी सरकार वेळोवेळी सॉवरेन गोल्ड बाँडच्या सीरिज जारी करते. याअंतर्गत गुंतवणूकदारांना बाजारभावापेक्षा कमी किंमतीत सोने मिळते. तसेच त्यामध्ये सरकारकडून सुरक्षिततेची पूर्ण हमी दिली जाते. हा बाँड खरेदी करण्यासाठी ग्राहकांना केवायसीचे निकष बाजारपेठेतून सोने खरेदी करण्याप्रमाणेच असतील. सरकारची सॉवरेन गोल्ड बाँड ही योजना नोव्हेंबर 2015 मध्ये सुरू झाली.

गुंतवणूक कोण करु शकेल?

भारतात राहणारे नागरिक, हिंदू अविभाजित कुटुंबे, विश्वस्त, विद्यापीठे आणि सेवाभावी संस्था या गोल्ड बाँड योजनेत गुंतवणूक करु शकतात. या बाँडमध्ये किमान एक ग्रॅम गुंतवणूक केली जाऊ शकते. एखादी व्यक्ती किंवा हिंदू अविभाजित कुटुंब आर्थिक वर्षात या योजने अंतर्गत चार किलोपर्यंत गुंतवणूक करु शकते. ट्रस्टसारख्या संस्था आर्थिक वर्षात 20 किलोपर्यंत गुंतवणूक करु शकतात. सॉवरेन गोल्ड बाँड योजनेचा कालावधी आठ वर्षांचा आहे. नोव्हेंबर 2015 मध्ये ही योजना सुरु केली गेली.

(Sovereign Gold Bond Scheme 22 series subscription will open between 12 to 16 July)