Special Story | ‘काय करु साहेब? माश्या मारतोय!’ कोरोनाचा छोट्या दुकानदारांना मोठा फटका

| Updated on: Jan 31, 2021 | 9:11 AM

लॉकडाऊनची झळ आजही शेकडो दुकानदार सोसताना दिसत आहेत (Corona Pandemic hits small shopkeepers).

Special Story | काय करु साहेब? माश्या मारतोय! कोरोनाचा छोट्या दुकानदारांना मोठा फटका
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

मुंबई : कोरोना संकटाचा समाजाच्या प्रत्येक घटकाला मोठा फटका बसला. अनेकजणांना कोरानाची लागण झाली. त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय देखील बाधित झाले. याशिवाय करोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊन घोषित केला. या लॉकडाऊनची झळ आजही शेकडो दुकानदार सोसताना दिसत आहेत. अनेक दुकानांमध्ये अजूनही शूकशुकाट बघायला मिळतो. अनेकांचं दुकानाचं भाडं देखील निघत नसल्याने दुकानदार त्रस्त झाले आहेत. दुकानदारांच्या नेमक्या समस्या काय? याबाबतची सविस्तर माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत (Corona Pandemic hits small shopkeepers).

माल खराब झाला

देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर केंद्र सरकारने तातडीने पावलं उचलत लॉकडाऊन घोषित केला. जवळपास सुरुवातीचे तीन ते चार महिने कडक निर्बंध होते. या काळात अनेक दुकानं बंद राहिले. दुकान बंद असल्याने शहरात राहण्यापेक्षा गावी निघून जाऊया, या विचारातून अनेक दुकानदार गावी गेले. मात्र, गावी गेल्यानंतर त्यांना शहरात परत येण्याचं तिकीट मिळत नव्हतं. विशेषत: जे दुकानदार उत्तर प्रदेश आणि झारखंड सारख्या भागातील आहेत. त्यांना आजही तिकीट मिळणं कठीण होऊन बसलं आहे. या दरम्यान काही दुकानदार शहरातच वास्तव्यास होते. सरकारकडून दुकानं सुरु करण्यास परवानगी मिळाली तो पर्यंत बराच माल खराब झाला होता. त्यामुळे त्यांना तो माल फेकून द्यावा लागला (Corona Pandemic hits small shopkeepers).

सम-विषमचा फायदा तसा फटकाही

मिशन बिगेन अंतर्गत सरकारने सम-विषम फॉर्म्युल्याने दुकानं उघडण्यास परवानगी दिली. या निर्णयाचा थोडाफार फायदा झाला तरी तोटादेखील झाला. नियोजित वेळेपेक्षा थोडा जरी विलंब झाला किंवा लवकर दुकान उघडलं तर महापालिका कर्मचारी थेट दुकानाबाहेर ठेवलेल्या वस्तू गाडीत टाकून घेऊन जायचे. याशिवाय दुकानाबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी उसळायची. मात्र, तितका पुरेसा माल दुकानात नसल्याने ग्राहक नाराज व्हायचे आणि दुसरीकडे जायचे. त्यामुळे नाराज झालेले ग्राहक पुन्हा दुकानात यायला वेळ लागायचा.

उधारी वाढली

कोरोना काळात जो माल घ्यायचो त्याचा व्यापाऱ्यांना जागेवरच पैसे द्यावे लागायचे. अर्थात ते देखील आपला जीव मुठीत ठेवून मेहनत करत होते. त्यामुळे त्यांना पैसे देणे बंधनकारक होतं. मात्र, दुसरीकडे दुकानदारांचे अनेक ग्राहक उधार सामान घेऊन जायचे. कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेकांची पगारकपात झाली. त्यामुळे या संकटसमयी ग्राहकांची दुकानदार सांभाळून घेईल, अशी आशा होती. त्यामुळे दुकानदारांना तशा ग्राहकांना सांभाळून घ्यावंच लागलं. अशा ग्राहकांकडून आजही पैसे मिळालेले नाहीत. ते देतील याची निश्चितच खात्री आहे. मात्र, या उधारीमुळे हातात पैसा राहिला नाही. परिणामी, बऱ्याचवेळा दुकानातील सामान घेण्यासाठी पैसे शिल्लक नसतात.

माल घेण्यासाठी वणवण

छोटे दुकानदार एखाद्या होलसेलरकरडे जाऊन सामान आणतात. कोरोना काळात या होलसेलरांकडे पुरेसा माल नसायचा. शिवाय होलसेलरांचे गोडाऊन बंद असायचे. याशिवाय सरकारने दुकनांसाठी वेळ निश्चित केल्याने त्या वेळेत तिथे प्रचंड गर्दी व्हायची. त्यामुळे दोन ते तीन दिवस मोकळ्या हातानेच अनेकांना परत यावं लागायचा. एखाद्या वेळी माल घेण्यासाठी नंबर लागला तर बऱ्याचदा त्यांना हव्या असणाऱ्या काही वस्तू संपलेल्या असायचा.

ऑनलाईन शॉपिंग

आता कोरोनाची परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आली आहे. मात्र, तरीदेखील छोट्या दुकानदारांपुढील आव्हानं काही कमी होताना दिसत नाहीत. कोरोना काळात ऑनलाईन शॉपिंगची संकल्पाना जास्त दृढ झालीय. ऑनलाईन शॉपिंगवर ग्राहकांना अनेक ऑफरही असतात. याशिवाय काही वेळा डिलिव्हरी चार्जेस घेतले जात नाही. त्यामुळे ग्राहक आता आपल्या घरातील किराणा सामानही ऑनलाईन मागवत आहेत. त्यामुळे त्याचा थेट परिणाम छोट्या दुकानदारांच्या व्यवसायावर पडत आहे. यामध्ये आणखी एक तक्रार अशी की, ग्राहकांकडे जेव्हा पैसै नसतात किंवा त्यांना उधार हवं असेल तर ते दुकानात येतात. पगार झाल्यावर पैसे परत करुन जातो, असं काही ग्राहक सांगतात. मात्र, ते परत दुकानाकडे ढुंकूनही बघत नाही. याउलट ते पैसे असल्यावर ऑनलाईन सामान मागवतात. त्यानंतर थेट महिन्याअखेरला दुकानात पुन्हा उधार सामान घ्यायला येतात, अशीदेखील काही दुकानदारांची तक्रार आहे.

आमच्या आणखी काही स्पेशल स्टोरी वाचा :

Special Story | आईसोबत भाजीविक्री, नंतर शिक्षक ते अधिकारी, सुदाम महाजन यांचा थक्क करणारा प्रवास !

Special Story | संयमी स्वभाव आणि धडाकेबाज कामगिरी, मराठमोळ्या अधिकाऱ्याची कर्तबगार कहाणी

Special Story | नारपार प्रकल्प : महाराष्ट्राचं पाणी गुजरातला जाणार ही काळ्या दगडावर कोरलेली रेघ