सोलापुरात तिकीट वाटपाआधाची सुशील कुमार शिंदे आणि अमर साबळे आमनेसामने

| Updated on: Jul 05, 2019 | 4:34 PM

सोलापूर : येत्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक राजकीय पक्षाकडून  आपपल्या परीने तयारी सुरू आहे. सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठीही प्रमुख पक्षांकडून तयारी सुरु आहे. मात्र निवडणुकांच्या आधीच तिकीट वाटपावरून आता राजकीय नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगू लागलाय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे आणि भाजपचे राज्यसभा खासदार अमर साबळे यांच्यात असाच प्रकार समोर आलाय. सोलापूर राखीव मतदारसंघातून विद्यमान खासदार शरद […]

सोलापुरात तिकीट वाटपाआधाची सुशील कुमार शिंदे आणि अमर साबळे आमनेसामने
Follow us on

सोलापूर : येत्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक राजकीय पक्षाकडून  आपपल्या परीने तयारी सुरू आहे. सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठीही प्रमुख पक्षांकडून तयारी सुरु आहे. मात्र निवडणुकांच्या आधीच तिकीट वाटपावरून आता राजकीय नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगू लागलाय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे आणि भाजपचे राज्यसभा खासदार अमर साबळे यांच्यात असाच प्रकार समोर आलाय.

सोलापूर राखीव मतदारसंघातून विद्यमान खासदार शरद बनसोडे यांच्या सुमार कामगिरीबाबत पक्षश्रेष्ठी त्यांच्यावर नाराज असल्याचं बोललं जातं. त्यामुळे त्यांचा येत्या निवडणुकीत पत्ता कट झाल्याची चर्चा आहे. राज्यसभेचे खासदार अमर साबळे हे सोलापुरातून इच्छुक असून त्यासाठी मागील एक वर्षभरापासून त्यांचे सोलापूरचे दौरे वाढले आहेत.

याचाच संदर्भ घेऊन खासदार सुशील कुमार शिंदे यांनी अमर साबळेंना खोचक टोला लगावलाय. अमर साबळेंनी आधी पक्षाकडून तिकीट आणावं, अन्यथा लुडबूड करू नये, असा सल्ला शिंदेंनी दिलाय. शिवाय खासदार अमर साबळे म्हणजे ‘उतावीळ नवरा, गुडघ्याला बाशिंग,’ अशी टीका केली आहे.

या टीकेला उत्तर देताना खासदार अमर साबळे यांनी शिंदेंची पायाखालची वाळू सरकली असून त्यामुळेच त्यांनी असं वक्तव्य केल्याचं म्हटलंय. नवरदेव म्हटल्याबद्दल शिंदेंना साबळेंनी धन्यवाद दिले आहेत. सोलापुरातलं राजकीय वातावरण निवडणुकीअगोदरच तापल्याचं चित्र झालंय.

2014 साली झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत देशभरात काँग्रेसचा धुव्वा उडालेला असताना इकडे मोदींच्या त्या सुनामीचा चांगलाच प्रभाव पडला. आपल्या कुंडलीत पराभव नसल्याचं छातीठोकपणे सांगणाऱ्या शिंदेंच्या कुंडलीत मोदी लाटेचा शनी आला आणि त्याच्या प्रभावाने 40 वर्षांच्या राजकीय प्रवासात कधी न पाहिलेल्या पराभवाला शिंदे सामोरे गेले. त्यावेळी देशभरात मोदी नावाचं वादळ घोंगावत असताना सोलापूर लोकसभा मतदारसंघात त्याचा फारसा परिणाम जाणवत नव्हता. इतकंच काय, भाजपच्या उमेदवाराचा सुद्धा पत्ताच नव्हता. ऐनवेळी भाजपने नवख्या असलेल्या शरद बनसोडेंना बोहल्यावर बसविले. त्यामुळे शिंदेंच्या विजयाचा घोडा पुढे जाईल असं चित्र असतानाच निकालानंतर शिंदेंना धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलं.

शरद बनसोडेंचा पत्ता कट?

आता पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या निवडणुका काही दिवसात होणार आहेत. त्या निमित्ताने मोदी-शाह जोडी कामाला लागली आहे. रोज एका ठिकाणी सभा घेऊन सरकारने केलेल्या कामाचा डांगोरा पिटवत विरोधकांवर टीकेचा भडीमार सुरु आहे. इकडे सोलापूरच्या लोकसभेचा उमेदवार कोण हे पुन्हा एकदा भाजपने गुलदस्त्यात ठेवलंय. विद्यमान खासदार शरद बनसोडे यांच्या कामांबाबत मतदारसंघातील लोक जसे नाराज आहेत त्याच पद्धतीने भाजपने घेतलेल्या प्रोग्रेस कार्डमध्ये शरद बनसोडेच्या कामकाजाबद्दल पक्षश्रेष्ठी नाराज आहेत. त्यामुळे जवळजवळ त्यांचा पत्ता कट झालाय. म्हणूनच की काय नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोलापूर दौऱ्यावेळी त्यांना नियोजनापासून दूर ठेवण्यात आलं.

भाजपचेच राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांचे सोलापूर दौरे वाढले आहेत. त्यामुळे बनसोडेंचा पत्ता कट होऊन अमर साबळेची वर्णी लागते की काय अशी चर्चा आहे. इकडे भाजपचा उमेदवार ठरला नसला तरी काँग्रेसच्या गोटातही तळ्यातमळ्यात सुरु आहे. मात्र काँग्रेसपुढे सुशीलकुमार शिंदेंशिवाय दुसरा पर्याय नसल्यामुळे शिंदे काँग्रेसचे उमेदवार राहणार आहेत. मात्र शिंदेचाही म्हणावा तितका मार्ग सोपा नसल्याचं राजकीय अभ्यासकांचं मत आहे. मात्र शरद बनसोडे यांच्या कामाची स्तुती करत भाजप नेत्यांनी त्यांच्या उमेदवारीबाबत मौन बाळगलंय.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातली ए टू झेड माहिती वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा