
आर्थिक सुरक्षा आता अधिक गरजेची झाली आहे. आई-वडिल त्यांच्या मुलांचे भविष्य अधिक उज्ज्वल करण्यासाठी आर्थिक योजना आखतात. मुलांच्या जन्मानंतर काही वर्षांतच अशा योजनांमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते. शिक्षण आणि आरोग्य यावरील खर्च दिवसागणिक वाढत आहे. या कारणामुळे सुरुवातीपासून आर्थिक नियोजन गरजेचे ठरते. या 3 जबरदस्त गुंतवणूक योजना तुमच्यासाठी चांगल्या ठरतील. या योजना आता सुरु करून तुम्ही भविष्यातील गरजा पूर्ण करू शकता.
सुकन्या समृद्धी योजना
सुकन्या समृद्धी योजना(SSY) ही मुलींच्या भविष्यासाठी चांगली योजना आहे. ही सरकारी योजना आहे. मुलगी वाचवा, मुलगी शिकवा या उपक्रमातंर्गत ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेत कर बचतीसह विविध अल्पबचत योजनांपेक्षा अधिक व्याजदर मिळतो. सध्या या योजनेत गुंतवणुकीवर 8.2 टक्के व्याज देण्यात येते. पालकांसाठी विविध योजनांमध्ये हा एक चांगला पर्याय मानण्यात येतो. या योजनेत केवळ 250 रुपयांपासून ते पुढे खाते उघडता येते. ही योजना 21 वर्षात मॅच्युअर होते. मुलीचे लग्न, तिचे शिक्षण यासारख्या दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी ही योजना चांगली मानण्यात येते.
मुदत ठेव योजना
कमी जोखीम हवी असेल तर मुदत ठेव योजना, एफडी हा चांगला पर्याय ठरू शकतो. एफडी बँकेपासून ते टपाल खात्यापर्यंत उघडता येते. मुदत ठेव ही बचत खात्याच्या तुलनेत एक हमीपात्र परतावा आणि अधिक व्याज देणारी गुंतवणूक ठरते. काही बँका मुलांसाठी खास एफडी योजना चालवतात. त्यात मुलांना आर्थिक शिक्षणासोबतच गुंतवणुकीवर रिवॉर्ड्स अथवा व्याज दर अधिक देण्यात येतो. एक रक्कमी पैसा गुंतवल्यामुळे उद्दिष्ठांसाठी त्याचा वापर करता येतो.
NPS वात्सल्य योजना
एनपीएस वात्सल्य योजना आई-वडिलांसाठी एक जोरदार पर्याय आहे. मुलांसाठी ज्यांना दीर्घकाळानंतर मोठी रक्कम हवी आहे. त्यांच्यासाठी हा गुंतवणुकीचा योग्य पर्याय मानण्यात येतो. जेव्हा मुल हे 18 वर्षांचे होते. तेव्हा हे खाते आपोआप NPS खात्यात रुपांतरीत होते.
या योजनेत वार्षिक कमीत कमी 1 हजार रुपये गुंतवणूक करता येते. या योजनेत 9.5 ते 10 टक्क्यांदरम्यान व्याज मिळते. चक्रवाढ व्याजामुळे काही वर्षात मोठा परतावा मिळतो. गुंतवणुकीचा योग्य पर्याय निवडून तुम्ही मुलांच्या भविष्यासाठी आतापासूनच आर्थिक नियोजन करू शकता.