
Gold and Silver Rate today : जागतिक बाजारात बुधवारी, 25 मार्च रोजी सोनं-चांदीच्या दरात जबरदस्त उसळण पहायला मिळाली. कमजोर डॉलर, कच्च्या तेलाच्या घसरत्या किमती आणि पश्चिम आशियातील सुरू असलेल्या युद्धामुळे निर्माण झालेले तणावपूर्ण वातावरण संपण्याच्या आशेने सराफा बाजारात नवचैतन्य संचारले. आज देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं.
MCX एमसीएक्सवर चांदीचा भाव जवळपास 5.5 टक्क्यांनी, म्हणजेच 12 हजारांहून अधिकने वाढून 2लाख 36 हजार रपेय प्रति किलोवर पोहोचला. तसंच काहीसं चित्र दुसरीकडेही होतं, तिथे सोन्याचा भाव जवळपास 4 टक्क्यांनी, म्हणजेच 5500 रुपयांहून अधिकने वाढून 1 लाख 44 हजार 400 रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला.
जागतिक बाजारात तेजी
आंतरराष्ट्रीय बाजारात, स्पॉट गोल्डच्या दरात 2 ते 2.5 टक्क्यांची वाढ होऊन ते प्रति औंस सुमारे 4,568 डॉलरवर पोहोचलं. अमेरिकन सोन्याच्या वायद्यांमध्येही 3 ते 4 टक्क्यांची वाढ झाली. चांदीही फार मागे राहिली नाही, स्पॉट चांदीच्या दरात 3.5 ते 3.8 टक्क्यांची वाढ होऊन ती प्रति औंस 73 डॉलरच्या वर पोहोचली.
किरकोळ विक्रीत किंमत कुठपर्यंत ?
बुलियन वेबसाइटनुसार, सोन्याचा भाव 5510 रुपयांनी वाढून प्रति 10 ग्रॅम म्हणजे 1 तोळ्यासाठी 1 लाख 44 हजार 950 रुपयांवर पोहोचला, तर चांदीचा भाव 12,010 रुपयांनी वाढून प्रति किलो 2, 36,750 रुपयांवर पोहोचला.
डॉलर आणि कच्च्या तेलाने दिला आधार
डॉलर कमकुवत झाल्यामुळे इतर चलनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी सोनं आणि चांदी स्वस्त झालं असून, त्यामुळे मागणी वाढली आहे. दरम्यान, कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 100 डॉलरच्या खाली घसरल्याने महागाईबद्दलची चिंता कमी झाली आहे. इराणसोबत करार घडवून आणण्याचे अमेरिकेचे प्रयत्न हे याचं प्रमुख कारण मानलं जातंय.
युद्ध आणि महागाईच्या भीतीमुळे अलीकडे दबावाखाली असलेला सोन्या-चांदीबद्दल, आता गुंतवणूकदारांचा दृष्टिकोन बदलत असल्याचं दिसत आहे. व्यापारी हळूहळू त्यांच्या सध्याच्या स्थितीमध्ये बदल करत असून, बाजारात नवीन खरेदी होताना दिसत आहे. तज्ज्ञांच्या मते, जर मध्य-पूर्वेतील तणाव कमी झाला आणि डॉलर कमकुवत राहिला, तर सोने आणि चांदीच्या दरांमधील ही तेजी कायम राहू शकते.