अंबानी फॅमिलीला अ‍ॅप्पलचे सीईओ देणार इतकं भाडं, रक्कम ऐकून व्हाल हैराण

| Updated on: Apr 23, 2023 | 6:51 PM

अ‍ॅप्पलचे सीईओ टीम कूक यांच्या हस्ते गेल्या आठवड्यात बीकेसीच्या अ‍ॅप्पल स्टोअरचे उद्घाटन झाले. या स्टोअरच्या महिन्याच्या भाड्यापेक्षा खरं इंगित रेव्हेन्यू शेअरिंगमध्ये आहे.

अंबानी फॅमिलीला अ‍ॅप्पलचे सीईओ देणार इतकं भाडं, रक्कम ऐकून व्हाल हैराण
ambani-APPLE
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई : स्टेटस सिम्बॉल बनलेल्या जगप्रसिद्ध आयफोनची निर्मिती करणाऱ्या अ‍ॅप्पल  ( Apple ) कंपनीचे देशातील पहिले रिटेल स्टोअर मुंबईच्या वांद्रे – कुर्ला कॉम्प्लेक्स अर्थात बीकेसी (BKC) येथे मंगळवार 18 एप्रिल रोजी उघडले. बीकेसीतील या मुंबईतल्या सर्वात महागड्या जागेत उघडलेल्या अ‍ॅप्पल कंपनीच्या स्टोअरची भव्यता आणि तिचा प्रत्येक कानाकोपरा सोशल मिडीयावर पाहिला जात आहे. इतकी या अ‍ॅप्पल ( Apple Store )  रिटेल स्टोअरची उत्सुकता आहे. आता या अ‍ॅप्पल स्टोअरचे भाडे किती असावे याविषयी अनेक शक्यता व्यक्त करण्यात येत आहेत.

दिल्ली येथे देशातील अ‍ॅप्पल स्टोअरचे दुसरे रिटेल स्टोअरचे उद्घाटन नुकतेच झाले. त्याआधीच देशातील पहिल्यावहिल्या अ‍ॅप्पल स्टोअरचे उद्धाटन देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील बीकेसी  (BKC)  येथे झाले. या अ‍ॅप्पल स्टोअरच्या उद्घाटनाला दस्तूर खुद्द टीम कूक, धकधक गर्ल माधुरी दीक्षित, अभिनेत्री मौनी रॉय, नेहा धुपिया आणि अरमान मलिक अशी झगमगाटी दुनियेतील तारकांची मांदीयाळीच अवतरली होती. रिलायन्स जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मॉल स्थित अ‍ॅप्पल कंपनीच्या स्टोअरची दृश्ये समाजमाध्यमावर सर्वाधिक पाहीली जात आहेत.

हे अ‍ॅप्पल स्टोअर खूपच शानदार आणि प्रशस्त आहे. येथे संपूर्ण नैसर्गिक प्रकाशाचा वापर झाडांचा सुरेख वापर करण्यात आला आहे. काचेच्या भल्यामोठ्या दालनात आकाशातील लुकलुकते ताऱ्यांप्रमाणे लावलेले दिव्यांची रंगसंगती पाहून तुम्हाला खूपच मजा वाटेल. बीकेसीची जमिनीचे दर पाहता मुकेश अंबानी यांना आता अ‍ॅप्पल कंपनीचे सर्वेसर्वा टीम कूक किती भाडे देत असावेत असा कयास बांधला जात आहे. अंबानी यांच्या मालकीच्या सुमारे 20,800 चौरस फूट प्रशस्त जागेवर अ‍ॅप्पलचे आलिशान स्टोअर उभारण्यात आले असून त्यासाठी 11 वर्षांचा करार करण्यात आला आहे.

अ‍ॅप्पलच्या रिटेल स्टोअरसाठी महिन्याचे भाडे किती असावे अशी उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. परंतू उडत्या बातमीनूसार अंबानी फॅमिलीला टीम कूक या स्टोअरसाठी महिन्याला 42 लाख रूपये देणार आहेत, तीन वर्षांचा हा करार असून दर तीन वर्षांनी भाड्यात 15 टक्के वाढ करण्यात येणार आहे. शिवाय कंपनी पहिल्या तीन वर्षांसाठी 2 टक्के रेव्हेन्यू शेअरिंगच्या योगदानसोबतच 42 लाखाची दर महिन्याला देणार आहे. आता अॅप्पलचे प्रोडक्टच इतके महाग असतात तर दोन टक्के उत्पन्नही किती जास्त असेल याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल.