Image Credit source: freepik
Career in Yoga : सध्या जगभरात योग किंवा योगासनांची (yoga) क्रेझ खूप वाढताना दिसत आहे. 21 जून रोजी ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 साली संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीदरम्यान ठेवला होता. तो मान्यही झाला. त्याच पार्श्वभूमीवर 2015 सालापासून, दरवर्षी 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस (International Yoga Day) साजरा केला जातो. सध्या ज्या वेगाने योगाचा विस्तार होत आहे, ते पाहता येत्या काळात या क्षेत्रातील नोकऱ्यांची मागणीही बरीच वाढत असल्याचे दिसून येत आहे.
जर तुम्हालाही योगामध्ये रस असेल आणि या क्षेत्रात करिअर करायची इच्छा असेल तर तुमच्यासाठी देश-विदेशात करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. योग हे असे माध्यम आहे, ज्यामुळे जगभरातील लाखो लोकं हे नैसर्गिकरित्या निरोगी झाले आहेत. अनेकांना योगाची मदत झाली आहे. यामुळे आजच्या घडीला मोठमोठ्या संस्थांमध्ये योग शिक्षकांना मोठी मागणी मिळताना दिसत आहे. योग क्षेत्रातील अभ्यासक्रम काय आहे, आणि त्या क्षेत्रात नोकरीची किती व कशी संधी आहे, हे आजच्या लेखातून जाणून घेऊया.
12वी नंतर किती संधी आहे ? कुठले कोर्स करू शकता ?
योग क्षेत्रातील अनेक मोठ्या शैक्षणिक संस्थांमध्ये अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री आणि डिप्लोमा प्रोग्राम चालवले जात आहेत. त्याचबरोबर अनेक सर्टिफिकेट कोर्सही उपलब्ध आहेत. जर तुम्ही 12वी पास असाल तर तुम्ही UG कोर्ससाठी अर्ज करू शकता. योग क्षेत्रात तुम्ही B.Sc in Yoga आणि BA in Yoga हा कोर्स करू शकता येतो. याशिवाय योगामध्ये एमए, योगामध्ये एमएससी, योगामध्ये यूजी डिप्लोमा, पीजी डिप्लोमा इन योग, असे अनेक कोर्स करू शकता.
खालील प्रसिद्ध संस्थांमध्ये हे कोर्स उपलब्ध आहेत
इंडियन इंस्टीट्यूट ऑफ योग अँड नेचरोपॅथी, नवी दिल्ली राजर्षि टंडन ओपन विश्वविद्यालय, उत्तर प्रदेश देव संस्कृति यूनिव्हर्सिटी, हरिद्वार, उत्तराखंड यूनिव्हर्सिटी ऑफ राजस्थान वर्धमान महावीर ओपन यूनिव्हर्सिटी, राजस्थान श्री लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विश्वविद्यालय, नवी दिल्ली बिहार योग विद्यालय
या क्षेत्रात मिळू शकते नोकरी
योग क्षेत्रात यूजी, पीजी किंवा डिप्लोमा कोर्स केल्यानंतर तुम्ही नोकरीसाठी अर्ज करू शकता. आजकाल शाळांमध्ये योग शिक्षक, जिममध्ये योग ट्रेनर, हेल्थ रिसॉर्टमध्ये ट्रेनर तसेच रिसर्चर या पदांसाठी भरती केली जात आहे. त्याशिवाय रुग्णालयातील रुग्णांवर उपचार करण्यासाठीही योग शिक्षकांची मागणी वाढू लागली आहे. यासाठी लाखो रुपयांपर्यंतही पगार मिळू शकतो.
अनेक आरोग्य केंद्रे, गृहनिर्माण संस्था आणि कॉर्पोरेट जगतातही योग प्रशिक्षकांची नियुक्ती केली जात आहे. याशिवाय एरोबिक्स इन्स्ट्रक्टर, (Aerobics Instructor), योग थेरपिस्ट आणि निसर्गोपचारक म्हणूनही काम करता येते. अनेक विद्यापीठांमध्ये योग हा अनिवार्य विषय म्हणूनही समाविष्ट करण्यात आला आहे.