क्रेनचा विजेच्या तारांना स्पर्श… धक्का इतका जोरदार थेट चौघा बाप लेकांचा जागीच मृत्यू, धक्कादायक घटनेने धाराशिवमध्ये सर्वच हादरले
धाराशिव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तुळजापूर येथील एका शेतकऱ्याच्या शेतात विहिरीतील मोटार काढण्याचे काम सुरु होते. हे काम सुरु असताना मोठा अपघात झाला आहे.

धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील केशेगाव गावात धक्कादायक घटना घडली. विजेच्या झटक्याने बाप-लेकासोबत दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडल्याचे समोर आले आहे. यात दोन शेतकरी कुटुंबांतील वडील आणि मुलाच्या जोडीचा समावेश आहे. ही घटना गणपती साखरे यांच्या शेतात घडली. नेमकं काय घडलं जाणून घ्या सविस्तर…
नेमकं काय घडलं
शेतातील विहिरीतून सबमर्सिबल मोटार बाहेर काढण्यासाठी क्रेनचा वापर केला जात होता. क्रेनच्या वरच्या भागाचा महावितरणच्या हायव्होल्टेज वीजवाहिनीला स्पर्श झाला आणि त्यातून क्रेनमध्ये करंट उतरला. यात मोटार काढण्याचे काम करणाऱ्या चौघांचाही क्षणार्धात मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठ्या संख्येने गर्दी केली. तुळजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी तुळजापूरच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
मृत्यू झालेल्या चौघांची नावे
या दुर्दैवी अपघातात दोन कुटुंबांवर मोठे संकट कोसळले आहे. एकाच वेळी चार जण गेल्याने गावात दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत्यू झालेल्या चौघांमध्ये कासिम कोंडिबा फुलारी (वय ५४), रतन कासिम फुलारी (वय १६), रामलिंग नागनाथ साखरे (वय ३०) आणि नागनाथ साखरे (वय ५५) यांचा समावेश आहे.
या घटनेमुळे नळदुर्ग परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे. विजेच्या धक्क्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी वीजवाहिनीपासून सुरक्षित अंतर राखणे गरजेचे असल्याचे पुन्हा एकदा या घटनेने अधोरेखित केले आहे.
