एक कॉल आला अन् एका क्षणात 600 कर्मचाऱ्यांची नोकरी गेली… जगभर पसरलेल्या कंपनीचा मोठा झटका
डिजिटल पेमेंट्स प्लॅटफॉर्म PayPal ने भारतात मोठ्या नोकरकपातीची घोषणा केली आहे, ज्यात सुमारे 600 कर्मचाऱ्यांना अचानक कामावरून काढून टाकण्यात आले. जागतिक पुनर्रचनेचा भाग म्हणून कर्मचाऱ्यांना कोणताही पूर्वसूचनेशिवाय, एका मिटिंग कॉलवर 'आज तुमचा शेवटचा दिवस' असे सांगून त्यांचे सिस्टीम ॲक्सेस बंद करण्यात आले. या अचानक झालेल्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

डीजिटल पेमेंट्स प्लॅटफॉर्म PayPal ने भारतात मोठ्या प्रमाणावर नोकर कपात सुरू केली आहे. या कंपनीने भारतातील आपल्या कंपनीतील 10 टक्के म्हणजे 600 कर्मचाऱ्यांना एका झटक्यात घरी बसवलं आहे. PayPal ने वैश्विक स्तरावर पुनर्रचना करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भारतासह इतर देशातीलही आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांनी घरचा रस्ता दाखवला आहे. अचानक मिटिंग बोलावून कर्मचाऱ्यांना आज तुमचा शेवटचा दिवस आहे, असं सांगितलं जात आहे. त्यानंतर कर्मचाऱ्यांचे सर्व अॅक्सेस बंद केले जात असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
PayPal मध्ये मोठ्या प्रमाणावर नोकर कपात सुरू झाल्याने खळबळ उडाली आहे. या वृत्तानंतर PayPal ने त्यावर खुलासा केला आहे. 31 ऑगस्ट 2026 पर्यंत भारतात त्यांच्या टीममधील 220 कर्मचारी म्हमजे जवळपास 4 टक्के कर्मचारीच या बदलाने प्रभावित झाल्याचा खुलासा PayPal ने केला आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, नुकत्याच करण्यात येत असलेल्या बदलामुळे आमच्या वैश्विक परिचालनाला सुटसुटीत बनवणे, कामात गतीमानता आणणे आणि कंपनीला दीर्घ काळाच्या विकासासाठी तयार करण्याची बहुवार्षिय योजनेचा हा भाग आहे. असे निर्णय कधीच सोपे नसतात. आमच्या कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या परिणामांची आम्हाला जाणीव आहे. आणि या कठिण काळात त्यांना सहकार्य करण्यास आम्ही प्रतिबद्ध आहोत.
मीडिया रिपोर्ट्स काय सांगतात?
मनीकंट्रोलच्या रिपोर्टनुसार, PayPalने चेन्नई, बंगळुरू आणि हैद्राबादच्या कार्यालयातील टेक्नॉलॉजी, इंजीनिअरिंग, ऑपरेशन्स, पेमेंट्स आणि फायनान्स सारख्या अनेक टीममध्ये नोकर कपात केली आहे. या कपाती पूर्वी भारतात कंपनीचे 6 हजाराहून अधिक कर्मचारी होते. तर, बिझनेस लाइनच्या एका रिपोर्टनुसार, कंपनीच्या पुनर्गठनाची प्रक्रिया पूरअण होईपर्यंत कंपनीच्या भारतातील 25 टक्के म्हणजे 1500 कर्मचाऱ्यांना त्याचा फटका बसू शकतो.
कर्मचाऱ्यांचा आरोप काय?
मीडियातील वृत्तानुसार, कर्मचाऱ्यांनी कंपनीवर थेट आरोप केला आहे. कोणतीही पूर्व सूचना न देता, नोटीस न देता अचानक एक कॉल करून कामावरून काढून टाकण्यात आलं आहे, असा आरोप कर्मचारी करत आहेत. आम्हाला कोणतीही पूर्व सूचना देण्यात आली नाही. आम्हाला सोमवारी 31 ऑगस्ट रोजी एक मिटिंग कॉल आला. त्यात आम्हाला सामील व्हायला सांगितलं. या कॉलवर देशभरातील विविध कार्यालयाती कर्मचारी होते. त्यावेळी आम्हाला कामावरून काढून टाकलं जात असल्याचं थेटच सांगितलं. त्यानंतर आमच्या सर्व सिस्टिमचा अॅक्सेस बंद करण्यात आला, असं एका पीडित कर्मचाऱ्याने सांगितलं.
आम्हाला केवळ ऑफ बोर्डिंग प्रक्रियेशी संबंधित एक मेल आला. आम्हाला जॉब असिस्टेन्स आणि एका महिन्याच्या वेतनाच्या रुपात सेव्हरेन्स पे देण्याचं आश्वासन देण्यात आलं. परंतु, फूल अँड फायनल सेटलमेंटबाबत अजूनपर्यंत कोणतीच स्पष्टता देण्यात आलेली नाही, असंही या कर्मचाऱ्याने सांगितलं. तर, 31 ऑगस्ट रोजी एक मेल आला. त्यात आम्हाला तुमचा आज शेवटचा दिवस आहे. तुम्हाला कामावरून काढण्यात येत असल्याचं म्हटलं होतं, असं दुसऱ्या एका कर्मचाऱ्याने सांगितलं.