Google मध्ये नोकरी करायची? कोणती हवी डिग्री, किती मिळेल पगार? एका क्लिकवर जाणून घ्या

Google Job: दरवर्षी भारतातूनच नाही तर जगभरातून 30 लाखाहून अधिक लोक गुगलमध्ये नोकरीसाठी अर्ज करतात. त्यामधील केवळ 1 टक्क्यांहून कमी उमेदवारांची निवड होते. कोणती असावी लागते डिग्री आणि किती मिळतो पगार?

Google मध्ये नोकरी करायची? कोणती हवी डिग्री, किती मिळेल पगार? एका क्लिकवर जाणून घ्या
गुगलमध्ये करायची नोकरी?
Image Credit source: google
| Updated on: Jan 25, 2026 | 2:54 PM

Work At Google: आज अनेक तरुणांचा ड्रीम जॉब हा गुगलमध्ये काम करणे हा आहे. गलेलठ्ठ पगार, अनेक सोयी-सुविधा, मुक्त काम करण्याचे स्वातंत्र्य, नवनवीन तंत्रज्ञान शिकण्याची सोय आणि इतर अनेक गोष्टींमुळे गुगलमध्ये काम करण्याची अनेकांची इच्छा असते. अनेक तरुण त्यासाठी जीवाचं रान करतात. प्रत्येकवर्षी भारतासह जगभरातील 30 लाखांहून अधिक तरुण Google मध्ये नोकरीसाठी अर्ज करतात. पण यातील केवळ एक टक्क्यांहून कमी लोकांची निवड होते.याचा अर्थ स्पष्ट आहे की गुगलमध्ये नोकरी मिळवणं सोप नाही. पण याचा अर्थ नोकरीच मिळत नाही असा नाही.

गुगलमध्ये नोकरीसाठी कोणती हवी पदवी?

गुगलमध्ये नोकरी मिळवण्यासाठी पदवीपेक्षा कौशल्य अत्यंत महत्त्वाचं आहे. तुमची तंत्रज्ञानावरील हतोटी महत्त्वाची आहे. गुगलमध्ये नोकरी मिळवण्यासाठी अत्यावश्यक पदवी (Preferred Education) B.E. / B.Tech (Computer Science / IT), MCA (Master of Computer Applications) सोबतच B.Sc / M.Sc (Computer Science) असणं आवश्यक आहे. पण गुगल केवळ तुमची पदवी नाही पाहत तर तुमची विचार करण्याची ताकद, क्रिएटिव्हिटी आणि समस्या सोडविण्याची तुमची क्षमता जोखली जाते.

अशी आहे नोकरीची प्रक्रिया

1. गुगलमध्ये नोकरी करण्यासाठी ऑनलाईन अर्ज (Apply Online) करावा लागतो. त्यासाठी Google Careers या संकेतस्थळावर जावे लागेल. इथं नोकरीसाठी आणि उल्लेखित पदांसाठी अर्ज करावा लागेल. रिझ्युमेमध्ये तुमचा प्रोजेक्ट्स इंटर्नशिप, तुमचे कौशल्य याची माहिती द्यावी लागेल. तर जर एखाद्या गुगल कर्मचाऱ्यांची शिफारस मिळाली तर तुमच्या नोकरीचा मार्ग मोकळा होतो.

2. जर तुमचे नाव अंतिम यादीत आले तर गुगल HR कडून तुम्हाला संपर्क साधण्यात येईल. तुमच्या करिअरविषयीची माहिती घेण्यात येईल. तुम्ही कुठे नोकरी करता, तुम्हाला गुगलमध्ये नोकरी का करायची. तुमचे काय कौशल्य आहे याची माहिती घेतली जाईल.

3. सुरुवातीला काही पदांसाठी घरबसल्या काम करण्याची मुभा मिळते. यामध्ये कोडिंग टेस्ट, केस स्टडी अथवा एखाद्या छोट्या प्रकल्पावर तुमची नियुक्ती करण्यात येते. तुमची विचार करण्याची क्षमता आणि समस्या तुम्ही कशी आणि किती दिवसात सोडवता हे तपासले जाते.

4. यानंतर तंत्रज्ञानावर आधारीत मुलाखत होते. हा तुमच्या गुगलमधील नोकरीचा सर्वात महत्त्वाचा टप्पा मानल्या जातो. यामध्ये तीन ते पाच मुलाखतीच्या फेऱ्या होतात. प्रत्येक मुलाखत ही जवळपास 45–60 मिनिटांची असते.

5. गूगलनेस (Behavioral Interview) ही त्यानंतरची खास चाचणी असते. तुमच्या व्यक्तिमत्वाचा कस यामध्ये लागतो. तुम्ही माणूस म्हणून आणि सहकारी म्हणून कसं काम करू शकता हे तपासलं जाते. यामध्ये तुमच्या व्यक्तिमत्वाची परीक्षा घेण्यात येते.

6. या सर्व कसोट्यांवर तुम्ही खरं उतरलात तर मग तुमच्या विषयी एक अंतिम निवड समिती निर्णय घेते. त्याआधारे ऑफर लेटर देण्यात येते. ही सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी साधारणता दोन महिने ही लागू शकतात.

गलेलठ्ठ पगारासाठी तयार राहा

गुगलमध्ये नव्या दमाच्या उमेदवारांना Software Engineer (Freshers) 15 लाख ते 40 लाख वार्षिक पगार देण्यात येतो. तर नोकरीचे ठिकाण आणि पदानुसार यामध्ये मोठा बदल होऊ शकतो. तर नवशिक्यांसाठी 50,000 ते 1 लाख रुपये प्रति महिना पगार मिळतो.