मोबाइल घेण्यावरून झालेल्या वादातून शेजाऱ्यावर चाकूने वार, अल्पवयीन मुलाने गमावला जीव

विरारमध्ये खिळा ठोकण्याच्या मुद्यावरून एका इसमाने महिला व मुलीला अमानुष मारहाण केल्याची घटना ताजी आहेच. असं असतानाच आता मालाडमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मोबाईल घेण्याच्या वादावरून अवघ्या 16 वर्षांच्या मुलाला त्याचा जीव गमवावा लागला आहे.

मोबाइल घेण्यावरून झालेल्या वादातून शेजाऱ्यावर चाकूने वार, अल्पवयीन मुलाने गमावला जीव
crime scene news
| Updated on: Nov 29, 2024 | 10:10 AM

मुंबईत गेल्या काही दिवसांत गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. विरारमध्ये खिळा ठोकण्याच्या मुद्यावरून एका इसमाने महिला व मुलीला अमानुष मारहाण केल्याची घटना ताजी आहेच. असं असतानाच आता मालाडमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मोबाईल घेण्याच्या वादावरून अवघ्या 16 वर्षांच्या मुलाला त्याचा जीव गमवावा लागला आहे. याप्रकरणी 20 वर्षांच्या तरूणाला अटक करण्यात आली आहे. फरदीन युनुस खान (१६) असे मृत तरूणाचे नाव आहे. तर आमिर गुल्लू साजेदा (वय 20) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आमिर याच्याविरोधात आधीच काही गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी तीन गुन्हे दिंडोशी पोलिस ठाण्यात तर एक वनराई पोलीस स्टेशनमध्ये आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत फरदीन आणि आरोपी आमिर हे दोघेही शेजारी रहायचे. फरदीनने काही कारणास्तव आरोपी आमिरचा मोबाईल घेतला होता. मात्र त्याने तो काही परत दिला नाही. त्याच मुद्यावरून बुधवारी दोघांमध्ये मोठं भांडण जालं. बघता-बघता वाद पेटला आणि मारामारीही झाली. त्यात आमिरच्या नाकाला लागलं, त्यामुळे संतापलेल्या आमिरने रागाच्या भरात फरदीनवर चाकूने जीवघेणा हल्ला केला.

गंभीररित्या जखमी झालेल्या फरदीनला रुग्णालयात नेण्यात आलं मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. घटनेची माहिती मिळताच दिंडोशी पोलिसांनी आरोपी आमिरविरोधात गुन्हा दाखल करत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र हत्येसाठी वापरलेला चाकू अजूनही सापडलेला नसून त्याचा शोध घेण्यात येत आहे.