
Madhya Pradesh : सध्या भिखारी हे देखील डिजिटल माध्यमांचा वापर करत आहेत. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रेन आणि जिथे गर्दी असेल अशा ठिकाणी भिखारी दिसतात. हे भिखारी थेट पैसे सुट्टे नसतील तर ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी PhonePe Scanner देतात. हे पाहून तिथे असणारा देखील थक्क होतो. पण असाच एक प्रकार सध्या समोर आला आहे. जो ऐकून तुमच्या देखील पायाखालची जमीन सरकेल.
मध्य प्रदेशातील इंदूर शहरातील रस्त्यांवर सुरू असलेल्या भिक्षावृत्तीमागील एक अत्यंत धक्कादायकबाब समोर आली आहे. सराफा परिसरात अनेक वर्षांपासून भीक मागणारा एक भिकारी प्रत्यक्षात प्रचंड संपत्तीचा मालक असल्याचे उघड झाले आहे. या भिकाऱ्याचे नाव मंगीलाल असून त्याच्याकडे तीन घरे, तीन ऑटो रिक्षा आणि एक आलिशान कार असल्याची माहिती समोर आली आहे.
महिला व बाल विकास विभागाच्या वतीने सुरू असलेल्या भिक्षावृत्ती निर्मूलन मोहिमेअंतर्गत मंगीलालला रेस्क्यू करण्यात आले. त्यावेळी त्याची खरी ओळख समोर आल्यानंतर अधिकारीही थक्क झाले.
भीक मागून दररोज हजारोंची कमाई
सराफा भागातील अरुंद गल्लीमध्ये मंगीलाल लाकडी घसरगुंडीची गाडी, पाठीवर पिशवी आणि हातात जुने बूट घेऊन उभा राहत होता. तो कोणाकडेही काही मागत नसे; मात्र, लोक त्याची अवस्था पाहून स्वतःहून त्याला पैसे देयचे. या पद्धतीने तो दररोज 500 ते 1000 रुपये कमवत असल्याचे तपासात उघड झाले.
चौकशीत मंगीलालने धक्कादायक कबुली दिली की, भीक मागून मिळालेल्या पैशांचा वापर तो सराफा परिसरातील काही व्यापाऱ्यांना व्याजाने कर्ज देण्यासाठी करत असे. तो एक दिवस आणि एक आठवड्याच्या हिशोबाने पैसे उधार देत असे आणि दररोज सराफा भागात येऊन व्याज वसूल करायचा.
संपत्तीची यादी ऐकून अधिकारीही चकित
रेस्क्यू टीमचे नोडल अधिकारी दिनेश मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगीलालकडे इंदूर शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये तीन घरे आहेत. याशिवाय मंगीलालकडे तीन ऑटो रिक्षा असून त्या तो भाड्याने चालवतो. इतकेच नाही तर त्याच्याकडे आलिशान कार देखील आहे. जी चालवण्यासाठी त्याने स्वतंत्र ड्रायव्हर ठेवलेला आहे.
मंगीलाल हा अलवास परिसरात आपल्या आई-वडिलांसोबत राहत असून त्याचे दोन भाऊ वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. जिल्हा कार्यक्रम अधिकारी रजनीश सिन्हा यांनी सांगितले की, फेब्रुवारी 2024 पासून इंदूरमध्ये भिक्षावृत्तीमुक्त शहर अभियान राबवले जात आहे.