राज्य सरकारच्या पर्यटन संचालनालयालाच लाखोंचा गंडा, बनावट चेकद्वारे लुटले पैसे

| Updated on: Mar 14, 2024 | 12:15 PM

बनावट चेक वापरून राज्याच्या पर्यटन संचालनालय विभागाच्या बँक खात्यातून तब्बल 68 लाख रुपये काढण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू केला आहे.

राज्य सरकारच्या पर्यटन संचालनालयालाच लाखोंचा गंडा,  बनावट चेकद्वारे लुटले पैसे
Follow us on

मुंबई | 14 मार्च 2024 : बनावट चेक वापरून राज्याच्या पर्यटन संचालनालय विभागाच्या बँक खात्यातून तब्बल 68 लाख रुपये काढण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी राज्य पर्यटन संचालनालयाचे मुख्य लेखा अधिकारी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सोमवारी मरीनड्राईव्ह पोलिस ठाण्यात चौघांवर 34,419, 420,465,367,468, 471,473, भादंवि कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्य पर्यटन संचालनालयाचे मुख्य लेखा अधिकारी यांच्या तक्रारीनुसार, आरोपींनी 13 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी दरम्यान राज्य सरकारच्या पर्यटन संचालनालय विभागाच्या बँक ऑफ महाराष्ट्र, मंत्रालय शाखेतून 15 बोगस चेक्सवर बोगस शिक्के व बोगस सह्या करून हे पैसे वळवले. त्यांनी एकूण 68 लाख 67 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. व्यवहारात गोंधळ दिसताच पर्यटन विभागाने तत्काळ संबंधित बँकेला माहिती दिली आणि पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली.

ते चौघे कोण ?

तक्रारीत नमूद करण्यात आल्यानुसार, बोगस चेकद्वारे काढण्यात आलेल्या पैशांपैकी. आरोपी आकाश डे याच्या खात्यावर 22 लाख 79 हजार, तपन मंडल – 22 लाख 73 हजार, लक्ष्मी पाल- 13 लाख 91 हजार , आणि आनंद मंडल याच्या खात्यात – 9 लाख 24 हजार जमा झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.