मालाडमध्ये अग्नीकल्लोळ, झोपडपट्टीला लागलेल्या भीषण आगीत एका बालकाचा मृत्यू

या घटनेत सुमारे 50 झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. अथक प्रयत्नांनी अग्नीशमन दलाला आग आटोक्यात आणण्यास यश आले आहे. सध्या कुलिंगचे काम सुरु आहे.

मालाडमध्ये अग्नीकल्लोळ, झोपडपट्टीला लागलेल्या भीषण आगीत एका बालकाचा मृत्यू
मालाडमध्ये झोपडपट्टीला भीषण आग
Image Credit source: TV9
| Updated on: Feb 13, 2023 | 2:16 PM

मुंबई / गोविंद ठाकूर (प्रतिनिधी) : मालाड पूर्वेतील कुरार येथील जमऋषी नगर भागातील झोपडपट्टीला भीषण आग लागल्याची घटना आज सकाळी साडेअकराच्या वाजण्याच्या सुमारास घडली. आगीत जखमी झाल्याने 12 वर्षाच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. प्रेम तुकाराम मोरे असे मयत मुलाचे नाव आहे. या घटनेत सुमारे 50 झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. अथक प्रयत्नांनी अग्नीशमन दलाला आग आटोक्यात आणण्यास यश आले आहे. सध्या कुलिंगचे काम सुरु आहे. लेवल 2 ची ही आग असून, आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.

आगीत 50 झोपड्या जळून खाक

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडेअकराच्या सुमारास मालाड पूर्वेतील कुरार येथील जमऋषी नगर भागातील झोपडपट्टीला अचानक लागली. आगीने बघता बघता रौद्र रुप धारण केले. झोपडपट्टीत आग पसरल्याने यात 50 झोपड्या जळून खाक झाल्या.

शर्थीचे प्रयत्न करत अग्नीशमन दलाकडून आग आटोक्यात

अग्नीशमन दलाला आगीची माहिती देण्यात आली. अग्नीशमन दलाच्या 5 ते 6 गाड्या तात्काळ घटनास्थळी रवाना झाल्या. शर्थीचे प्रयत्न करत अग्नीशमन दलाने आग आटोक्यात आणली.

आगीत भाजल्याने 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

या आगीत एक 12 वर्षाचा मुलगा प्रेम तुकाराम मोरे हा भाजल्याने त्याला तात्काळ कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान काही वेळातच त्याचा मृत्यू झाला.

आगीचे कारण अनभिज्ञ

दरम्यान, नेमक्या कोणत्या कारणातून आग लागली हे अद्याप कळू शकले नाही, अग्नीशमन दलाकडून कुलिंगचे काम सुरु आहे. तपासाअंतीच आगीचे कारण स्पष्ट होईल. अन्य जीवितहानीचे अद्याप वृत्त नाही.