नकली मुख्यमंत्र्यावर अखेर पुण्यात गुन्हा दाखल

समाजामध्ये मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी हा विजय मानेंवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नकली मुख्यमंत्र्यावर अखेर पुण्यात गुन्हा दाखल
| Updated on: Sep 19, 2022 | 8:47 PM

पुणे : नकली मुख्यमंत्री म्हणून प्रसिद्ध झालेल्या विजय मानेंवर(Vijay Mane) गुन्हा दाखल झाला आहे. पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यामध्ये हा दाखल झाला आहे. गणेशोत्सवादरम्यान या नकली मुख्यमंत्र्यांची मोठी क्रेज पहायला मिळली होती. अनेक ठिकाणी त्यांनी हजेरी लावली होती. तर त्यांचे डान्स करतानाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाले होते. अखेर आता गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढे काय कारवाई होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

समाजामध्ये मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी हा विजय मानेंवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय मानेंचा आरोपी शरद मोहळ सोबतच फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला होता. यानंतर मुख्यमंत्र्यांसारखा पेहराव करून विजय माने यांनी अनेक ठिकाणी नृत्य केल्याचा सुद्धा आरोप होत आहे.

या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव यांनी बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विजय नंदकुमार माने यांच्यावर IPC 419-511, 469, 500, 501, माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये (Information Technology Act) गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

हुबेहुब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सारखेच दिसतात

विजय माने हे हुबेहुब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सारखेच दिसतात. माने यांनी चेहऱ्यावर वाढवलेली दाढी, कपाळावरचा टिळा, आणि ते परिधान करत असलेले व्हाईट शर्ट आणि व्हाईट पॅन्ट, त्याबरोबर एकनाथ शिंदे यांच्यासारखाच चष्मा सगळ्यांमुळे माने हे शिंदे यांची डुप्लिकेट कॉपीच दिसतात.

नकली मुख्यमंत्र्यांसह सेल्फी काढण्यासाठी झुंबड

गणेशोत्सवात नकली मुख्यमंत्री विजय मानेंना पुण्यातील अनेक मंडळांनी आरतीसाठी बोलवले होते. माने रोज शहरभर फिरून सात ते आठ मंडळाच्या आरत्या पार पडत होते. त्यांना अनेक ठिकाणी उद्घाटनाला देखील बोलावलं जातय. वाढत्या क्रेजमुळे या नकली मुख्यमंत्र्यांसह सेल्फी काढण्यासाठी झुंबड होत होती.