डोंबिवलीत रिक्षाचालकाची मुजोरी, प्रवाशाला लाकडी दांडक्याने मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद

| Updated on: Mar 28, 2023 | 5:42 PM

डोंबिवलीत एक व्यक्ती घरी जाण्यासाठी रिक्षा पाहत होता. त्याने रिक्षावाल्याला भाडे किती विचारले. रिक्षाचालकाने मनमानी भाडे सांगितले. प्रवाशाने मनमानी भाडे देण्यास नकार दिला.

डोंबिवलीत रिक्षाचालकाची मुजोरी, प्रवाशाला लाकडी दांडक्याने मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद
रिक्षाचालकाकडून प्रवाशाला मारहाण
Image Credit source: TV9
Follow us on

डोंबिवली / सुनील जाधव : डोंबिवलीतील रिक्षाचालकांची दादागिरी वाढली असून, मनमानी भाडे आकारले जात आहे. याच वादातून एका प्रवाशाला रिक्षाचालकाने बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. नियमाप्रमाणे भाडे घेण्यास सांगणाऱ्या एका प्रवाशाला संतप्त रिक्षा चालकाने बांबूने बेदम मारहाण केल्याची घटना डोंबिवली येथील इंदिरा चौकात घडली. मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, यासंदर्भात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला आहे.

काय आहे प्रकरण?

काल रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास कल्याण पूर्वेत राहणाऱ्या गणेश तांबे हे आपल्या घरी जाण्यासाठी डोंबिवली इंदिरा चौकात रिक्षा पाहत होते. इंदिरा चौकातून टाटा पॉवरपर्यंत त्यांना जायचे होते. रिक्षेपर्यंत गेल्यानंतर आधी रिक्षा चालकाला भाडे किती घेणार असा प्रश्न विचारला. यावेळी रिक्षा चालकाने वाढवून भाडे सांगितल्याने त्यांनी इतके भाडे होत नाही, असे म्हणत नियमाप्रमाणे भाडे घेण्यास सांगितले.

यानंतर मुजोर रिक्षा चालकाने रिक्षातील बांबू काढून तांबे यांना बेदम मारहाण सुरू केली. या मारहाणीत तांबे जखमी झाले असून, त्यांच्यावर शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार करून सोडण्यात आले. मात्र रिक्षावाल्यांची ही वाढती दादागिरी पाहून डोंबिवलीतील सर्वच प्रवासी घाबरले असून, रिक्षावाल्यांची दादागिरी वाढल्याची चर्चा संपूर्ण शहरभर रंगली आहे.

हे सुद्धा वाचा

रामनगर पोलिसात गुन्हा दाखल

याआधी देखील महिला पत्रकारांना रिक्षा चालकांनी धक्काबुक्की केल्याची घटना घडली होती. मात्र वाहतूक पोलीस आणि आरटीओचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास रामनगर पोलीस करत आहेत.