कुत्र्याच्या भुंकण्यावरुन दोन कुटुंबांमध्ये जोरदार भांडण, भांडण हाणामारीपर्यंत गेले अन् अखेर…

कुत्रा भुंकत असल्याबाबतची तक्रार मालकाला खटकली. त्यावर मालकाने तक्रार करणार्‍याशी हुज्जत घालणे सुरू केले. सुरुवातीला बाचाबाची झाली. नंतर काही वेळातच या बाचाबाचीचे रूपांतर जोरदार हाणामारीमध्ये झाले.

कुत्र्याच्या भुंकण्यावरुन दोन कुटुंबांमध्ये जोरदार भांडण, भांडण हाणामारीपर्यंत गेले अन् अखेर...
Dog Attack
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jan 11, 2023 | 8:52 PM

लखनौ : क्षुल्लक कारणावरून वाद होण्याचे प्रकार आपल्या आसपास वारंवार घडत असतात. अनेकदा ही कारणे आपणाला न पटणारी असतात. विश्वास बसणार नाही अशा किरकोळ कारणावरून झालेला वाद अगदी हत्येपर्यंत पोहोचतो. उत्तर प्रदेशच्या बलिया जिल्ह्यामध्ये अशाच किरकोळ कारणावरून दोन कुटुंबांमध्ये वाद झाला आणि एका 50 वर्षांच्या महिलेची या वादातून हत्या करण्यात आली. या वादामागे धक्कादायक कारण होते ते म्हणजे कुत्रा अंगावर भुंकण्याचे. कुत्रा सारखा भुंकत असतो म्हणून कुत्र्याच्या मालकाकडे तक्रार केली गेली. त्यावरून दोन कुटुंबामध्ये कडाक्याचे भांडण झाले. यातून महिलेची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

जोरदार हाणामारीमध्ये पाच जण गंभीर जखमी

कुत्रा भुंकत असल्याबाबतची तक्रार मालकाला खटकली. त्यावर मालकाने तक्रार करणार्‍याशी हुज्जत घालणे सुरू केले. सुरुवातीला बाचाबाची झाली. नंतर काही वेळातच या बाचाबाचीचे रूपांतर जोरदार हाणामारीमध्ये झाले.

दोन कुटुंबे समोरासमोर एकमेकांशी भिडली. यात अनेकांना दुखापत झाली असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. याशिवाय 50 वर्षांच्या महिलेला प्राण गमवावा लागला. जखमींवर जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लाल मुनी असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे.

महिलेचे कुटुंबीय भटक्या कुत्र्यांना द्यायचे जेवण

हत्या झालेल्या महिलेचे कुटुंबीय रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांना जेवण द्यायचे. याचदरम्यान आरोपीचा कुत्रा वारंवार कुटुंबीयांच्या अंगावर भुंकत असे. त्यावरून अधूनमधून खटके उडाले होते.

अखेर हा वाद टोकाला गेला आणि एका हत्याकांडाची घटना घडली. लाल मुनी या महिलेचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.