शिर्डीत चाललंय काय?, तरूणावरील चाकू हल्ल्याने शहर पुन्हा हादरलं

शिर्डीत गुन्हेगारी प्रवृत्ती बळावत चालल्याच दिसून येतंय.खून- हल्ल्यांच्या या घटनांमुळे शिर्डीकर हादरलेले असतानाच आता शिर्डीमधून आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शहरात आणखी एका तरूणावर चाकूने वार करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे.

शिर्डीत चाललंय काय?, तरूणावरील चाकू हल्ल्याने शहर पुन्हा हादरलं
| Updated on: Feb 12, 2025 | 7:33 AM

कोट्यवधी भाविकांचे श्रद्धा स्थान असलेली शिर्डी सध्या गुन्हेगारीमुळे त्रस्त आहेत. 10 दिवसांपूर्वीच शिर्डीमध्ये साई संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला केल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. तसेच कामावर जाणाऱ्या आणखी एका तरूणावरही हल्ला करण्यात आला होता. शिर्डीत गुन्हेगारी प्रवृत्ती बळावत चालल्याच दिसून येतंय.खून- हल्ल्यांच्या या घटनांमुळे शिर्डीकर हादरलेले असतानाच आता शिर्डीमधून आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शहरात आणखी एका तरूणावर चाकूने वार करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे.

निवृत्त नगरपालिका कर्मचाऱ्याच्या मुलावर चाकूने हल्ला करण्यात आला. 35 वर्षांच्या सादिक शेख या तरूणावर शिर्डी शहरातील श्रीरामनगर परिसरात प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्याच्यावर चाकूने वार करण्यात आले. यामध्ये सादिक शेख हा इसम जखमी झाला असून त्याला उपचारांसाठी तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र हल्ल्यांच्या या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला आहे की नाही असा सवाल उपस्थित होत आहे.या प्रकरणी तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अधिक तपास करण्यात येत आहे.

शिर्डी हादरली

शिर्डीतील दुहेरी हत्याकांडाची घटना ताजी असतानाच शिर्डी शहरात पुन्हा एका तरुणावर चाकूने वार करण्यात आले. दुहेरी हत्याकांडानंतर पोलिसांकडून शहरात कारवाईचा धडाका सुरू असताना चाकू हल्ल्याने शिर्डी हादरली आहे. सादिक शेख यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात तर दाखल करण्यात आले, पण एकंदरच शहरातील गुन्हेगारी प्रचंड वाढल्याची चर्चा सुरू आहे. गेल्या आठवड्यातच शिर्डीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी हल्ल्याच्या या घटना घडल्या होत्या.

साई संस्थानमध्ये काम करणाऱ्या दोघांवर हल्ला करण्यात आला ज्यामध्ये त्यांनी प्राण गमावले. सुभाष साहेबराव घोडे आणि नितीन कृष्णा शेजुळ यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला. ते शिर्डी साई संस्थानमध्ये नोकरीला होते. सुभाष घोडे हे करडोबा नगर चौकाचे तर नितीन कृष्णा शेजुळ साकुरी शिवचे रहिवासी होते. तर कामावर निघालेल्या आणखी एका तरूणावरही असाच चाकू हल्ला करण्यात आला, त्यालाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, सुदैवाने तो बचावला.

शिर्डीत चाकू हल्ल्याच्या घटना होणं ही गंभीर बाब असून या घटनेमुळे शिर्डीत प्रचंड संताप आहे. वाढत्या गुन्हेगारी विरोधात शिर्डीकर आक्रमक झाले असून ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यासमोर ठिय्याही दिला आहे. स्थानिकांनी आरोपींविरोधात कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

शिर्डी साईबाबा संस्थानचा महत्त्वाचा निर्णय

शिर्डीत वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत.त्यातच शिर्डी श्री साईबाबा संस्थानाने मोफत प्रसाद भोजनाबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता साई बाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना टोकन पद्धतीने मोफत भोजन दिले जाणार आहे. साई प्रसादालयात मोफत भोजनासाठी भाविकांना आता कूपन दिले जाईल. शिर्डीत वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.