Mumbai Crime : तो मला वर्षभरापासून त्रास.., एनजीओच्या सेशनमध्ये ७ वर्षांच्या बालिकेने केलेल्या खुलाशाने पालकही हादरले !

ज्याला भावासारखं समजत होती तोच लहानग्या मुलीचं शोषण करत असल्याची माहिती समोर येताच तिच्या पालकांना तत्काळ याची माहिती देण्यात आली. मात्र प्रथम त्यांनी पोलिसांकडे जाण्यास टाळाटाळ केली.

Mumbai Crime : तो मला वर्षभरापासून त्रास.., एनजीओच्या सेशनमध्ये ७ वर्षांच्या बालिकेने केलेल्या खुलाशाने पालकही हादरले !
| Updated on: Sep 07, 2023 | 12:23 PM

मुंबई | 7 सप्टेंबर 2023 : मुलांना ‘गुड टच आणि बॅड टच’चे (good touch, bad touch)महत्व समजावण्यासाठी शाळेतून एका एनजीओचे सेशन आयोजित करण्यात आले होते. मात्र त्या दरम्यान एका ७ वर्षीय विद्यार्थिनीच्या खुलाशाने सर्वच चक्रावले. शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने वर्षभरापासून केलेल्या विनयभंगाबद्दल (molestation) तिने दिलेल्या माहितीमुळे शिक्षकही हादरले. यानंतर टिळक नगर पोलिसांनी स्टॉक एक्स्चेंजमध्ये काम करणाऱ्या 28 वर्षीय तरूणाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपरमधील एका शाळेमध्ये एका एनजीओतर्फे मुलांसाठी सेशन आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये त्यांना चांगला व वाईट स्पर्श ओळखण्याबाबत माहिती देण्यात आली. तेव्हा एनजीओच्या एका महिला कार्यकर्त्याला पीडित मुलीचं वागणं थोड वेगळ वाटल्याने तिला संशय आला. तिने त्या मुलीला
बाजूला नेले आणि विश्वासात घेऊन तिची विचारपूस केली. तेव्हा त्या मुलीने खुलासा केला की शेजारी राहणारा मुलगा तिला नेहमी अयोग्यरित्या स्पर्श करत असे आणि सारखं उचलून घेत असे, जे तिला आवडत नसे.

अवघ्या ७ वर्षांच्या त्या मुलीच्या या खुलाशानंतर तिच्या पालकांना याबाबत तातडीने माहिती देण्यात आली. मात्र आपली मुलगी त्या मुलाला दरवर्षी राखी बांधते, असे सांगत त्यांनी पोलिसांत जाण्यास टाळाटाळ केली. अखेर त्या एनजीओतर्फेच घाटकोपर पोलिसांकडे लेखी तक्रार पाठवण्यात आली. त्यांनी हे प्रकरण टिळक नगर पोलिसांकडे सोपवले. दरम्यान हे गैरकृत्य करणाऱ्या तरूणाला ताब्यात घेण्यात आले आहे. हे प्रकरण तांत्रिक स्वरूपाचे असून आरोपांना पुष्टी देण्यासाठी पुरावे शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आल्याचे पोलिसांनी सांगितले.