Kalyan Crime : लहान भाऊ आईसोबत भांडण करायचा, मुलगा मोठ्या भावाकडे तक्रार करण्यास गेला, मग जे घडलं ते भयंकर

लहान भाऊ एका महिलेशी भांडण करायचा. यामुळे महिलेचा मुलगा आपल्या मित्रासोबत त्याच्या मोठ्या भावाकडे तक्रार करायला गेला. पण तेथे गेल्यानंतर काही भलतंच घडलं.

Kalyan Crime : लहान भाऊ आईसोबत भांडण करायचा, मुलगा मोठ्या भावाकडे तक्रार करण्यास गेला, मग जे घडलं ते भयंकर
कल्याणमध्ये क्षुल्लक कारणातून तरुणावर हल्ला
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Aug 11, 2023 | 5:48 PM

कल्याण / 11 ऑगस्ट 2023 : लहान भावाची तक्रार सांगितल्याने मोठ्या भावाने दोन तरुणांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना कल्याण पूर्वेला घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाले आहेत. हातावर आणि मानेवर गंभीर जखमा झाल्याने तरुणाला मुंबईच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. राम कनोजिया असे जखमी तरुणाचे नाव आहे. हल्ल्याची थरारक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याप्रकरणी कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश चव्हाण, साहिल मोरे, तुषार वाल्मिकी आणि राहुल गौड अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

काय आहे प्रकरण?

कल्याण विठ्ठलवाडी येथे राहणारा आनंद सिंह तोमर हा रिक्षाचालक आहे. परिसरातील आकाश चव्हाण याचा लहान भाऊ आनंदच्या आईशी सारखा भांडण करायचा. यामुळे आनंद आपला मित्र राम कनोजियासोबत आकाशकडे गेला. आनंदने आकाशकडे त्याच्या भावाबाबत तक्रार केली. मात्र या तक्रारीचा आकाशला राग आला. आकाशने आनंद आणि राम यांना शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरवात केली.

यानंतर साहिल मोरे राम कनोजिया याच्या डाव्या हातावर कोयत्याने वार केला. मित्राला वाचवण्यासाठी गेलेल्या आनंदवरही साहिलने वार केला. यानंतरही आरोपीने दोघांना धमकी दिली. यानंतर आनंद आणि रामने कोळसेवाडी पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. तरुणाच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपींविरोधात भादवि कलम 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला.