IPS विश्वास नांगरे पाटील यांना झटका, गुन्हेगारांची एवढी हिंमती? पोलीस मुसक्या आवळणार?

सायबर गुन्हेगारांची हिंमत दिवसेंदिवस वाढत आहे. सामान्य नागरिक तर सोडा पण पोलिसांनाही या गुन्हेगारांना सोडले नाही. यामुळे सामान्य नागरिकांचे काय होत असेल, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

IPS विश्वास नांगरे पाटील यांना झटका, गुन्हेगारांची एवढी हिंमती? पोलीस मुसक्या आवळणार?
आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या नावे बनावट फेसबुक अकाऊंट
Image Credit source: Google
| Updated on: May 08, 2023 | 8:42 PM

मुंबई : आतापर्यंत सामान्य नागरिक, सेलिब्रेटी किंवा उद्योजकांच्या नावे फेक अकाऊंट बनवून फसवणूक करणाऱ्या सायबर टोळीने आता थेट पोलिसांकडेच आपला मोर्चा वळवला आहे. सायबर गुन्हेगारांनी शनिवारी महाराष्ट्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरोमध्ये अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत असलेले आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांचे बनावट फेसबुक प्रोफाइल तयार केले. राष्ट्रपती पोलीस पदक विजेते पोलीस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांनी स्वतः फेसबुकवर ही माहिती पोस्ट केल्यावर ही घटना उघडकीस आली. यानंतर सायबर पोलिसांकडून हे अकाऊंट डिलिट करण्यात आलं आहे. सायबर पोलीस गुन्हेगाराचा शोध घेत आहेत.

नांगरे पाटील यांनी काय म्हटलंय पोस्टमध्ये?

“नमस्कार मित्रांनो, एका फसवणुकदाराने माझ्या नावाने बनावट खाते तयार केले आहे आणि माझ्या काही संपर्कांतील काही लोकांना संदेश पाठवत आहे. मी त्वरित कायदेशीर कारवाई करत आहे, परंतु कृपया प्रतिसाद देऊ नका किंवा कोणत्याही प्रकारची माहिती सामायिक करू नका कारण हा फसवणूक करण्याचा प्रयत्न असावा! धन्यवाद.”

सायबर पोलिसांनी तात्काळ फेक प्रोफाईल डिलीट करत पुढील तपास सुरू केला आहे. यानंतर पाटील यांनी सायबर पोलीस पथकाचे आभार मानले आहेत. “त्वरीत कारवाई केल्याबद्दल आणि माझे बनावट फेसबुक प्रोफाइल खाते हटविल्याबद्दल सायबर पोलीस टीम, मुंबईचे आभार”, असे नांगरे पाटील यांनी म्हटलं आहे. डिसेंबरमध्ये पदोन्नती होण्यापूर्वी पाटील हे मुंबईचे सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) होते.

नांगरे पाटील यांच्या पोस्टवर नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

नांगरे पाटील यांच्या पोस्टनंतर नेटिझन्सने प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने पोस्ट केले आहे की, “गुन्हेगार धाडसी होत आहेत. जर ते एखाद्या आयपीएस अधिकार्‍यासोबत असे करू शकतात, तर ते सामान्य माणसाचे काय करतील?”. दुसर्‍याने म्हटले आहे, “पोलिसही सुटलेले नाहीत. त्यामुळे आपल्या राज्याच्या सायबर क्राईम स्थितीचा अंदाज न लावलेलाच बरा. सामान्य माणूस याला कसे हरवू शकतो? किती फसवणूक आणि सायबर गुन्हे घडत आहेत?”