सर्वात मोठी चोरी, रात्री शोरूममध्ये घुसला, निवांत झोप काढून मग सकाळी आरामात ‘त्याने’ लुटले दागिने, वाचा
Delhi Robbery : दिल्लीतील नामवंत ज्वेलर्सच्या शोरूममध्ये दरोडा घालणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अखेर अटक करण्यात आली. देशभरात अनेक मोठमोठया चोऱ्या करणाऱ्या लोकेशने गेल्या आठवड्यात दिल्लीतील एका शोरूममध्ये २५ कोटींची लूट केली. मात्र त्याची चोरीची पद्धत वेगळी आहे. शोरूममध्ये गेल्या गेल्या तो लगेच कामाला लागला नाही, ना लूट सुरू केली. खरंतर आतमध्ये गेल्यावर तो निवांत झोपला. त्याला पकडलं जाण्याची भीतीच वाटत नव्हती.

नवी दिल्ली | 2 ऑक्टोबर 2023 : राजधानी दिल्लीतील उमराव सिंह या नामवंत ज्वेलर्सच्या शोरूममध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या मोठ्या चोरीने सगळ्यांच्याच तोंडचं पाणी पळालं होतं. सोनं, चांदी आणि हिऱ्यांचे २५ कोटींचे (25 crore jewellery) दागिने चोरीला गेल्यामुळे ज्वेलर्सच्या मालकांना खूपच धक्का बसला. नामवंत ज्वेलर्सवर पडलेल्या या दरोड्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित झाला. अखेर पोलिसांनी प्रयत्नांची शर्थ करत या दरोड्यातील आरोपींना अटक केली. त्यापैकी एक, लोकेश हा अतिशय सराईत आणि कुख्यात गुन्हेगार आहे.
त्याने फक्त दिल्लीतच नव्हे तर देशभरातील अनेक राज्यांमध्ये अनेक चोऱ्या केल्या, दरोडा टाकल्याचे चौकशीतून समोर आले आहे. त्याच्याविरोधात तेलंगण, महाराष्ट्र, दिल्ली, छत्तीसगड या राज्यांमध्ये चोरीचे गुन्हे दाखल आहेत. मात्र या कुख्यात गुन्हेगाराची चोरीची पद्धतही अजब आहे. दिल्लीतील जंगपुरा भागातील उमराव सिंह ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याआधी त्याने पुरेशी रेकी केली होती.
एवढंच नव्हे तर चोरी करण्यासाठी रात्री आतमध्ये घुसल्यानंतर तो लगेचच कामाला लागला नाही. उलट त्याने निवांत झोप काढून मग दुसऱ्या दिवशी सकाळी लूट सुरू केली आणि संध्याकाळी लुटीचा माल घेऊन तो बाहेर पडला , अशी माहिती पोलिसांनी दिली.
चोरीपूर्वी काढली निवांत झोप
दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सांगण्यानुसार, २४ सप्टेंबरला चोरी करायला आत घुसण्यापूर्वीच लोकेशने संपूर्ण रेकी केली आणि रात्री उशीरा तो शोरूममध्ये गेला. त्याआधी जंगपुरा येथील एका ढाब्यावरच तो निवांत जेवला. तेथून अर्ध्या तासात तो घटनास्थळी पोहोचला. मात्र शोरूममध्ये असताना २० तास त्याने काहीच खाल्लं नाही, फक्त कोल्डड्रिंकवर होता. एकदा आत शिरल्यावरही तो निवांत होता, काम सुरू करायची त्याला घाई नव्हती. ना पकडले जाण्याची काही भीती वाटत होती.
शोरूममधल्या सोफ्यावर जाऊन तो मस्त झोपला. दुसऱ्या दिवशी (सोमवारी) सकाळी आरामात उठला आणि त्यानंतरच त्याने सकाळी 11 वाजता दागिने गोळा करण्यास सुरुवात केली होती. त्यासाठी त्यांनी स्ट्राँग रूमची भिंत कापली होती. शोरूममधला लुटीचा सगळा माल भरून झाल्यानंतर सोमवारी संध्याकाळी 7.30 च्या सुमारास तो बाहेर पडला आणि फरार झाला.
शोरूममध्ये गेल्यानंतर तो शेजारच्या इमारतीच्या छतावरून चोरी करून पळून जायचा, असे आत्तापर्यंतच्या तपासात सांगण्यात आले. लोकेश हाच या घटनेतील मुख्य चोर असून त्याला कठोर शिक्षा करण्यासाठी दिल्ली पोलिसांकडे पुरेसे पुरावे आहेत. शोरूममध्ये प्रवेश करताना आणि चोरीनंतरही निघून जाताना लोकेशचा चेहरा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
एवढंच नव्हे तर चोरी केल्यावर ज्या ऑटोने तो कश्मीरी गेट बस स्थानकावर पोहोचला, पोलिसांना त्या ऑटो रिक्षाचा नंबरही मिळाला. ऑटो चालकाने आरोपी लोकेशचा चेहरा ओळखून , त्याची ओळख पटवली. तसेच बसस्थानकावरही त्याचे सीसीटीव्ही फुटेजही सापडले आहे. तिकीट बुकिंगचा पुरावा आणि तेथूनच लोकेशचा मोबाईल नंबर पोलिसांना मिळाला आहे. त्याच्या दोन्ही फोनचे लोकेशन जंगपुरा आणि काश्मिरी गेट बसस्थानकात असल्याचे पोलिसांना सापडले.
