TET Scam शिक्षक पात्रता चाचणी घोटाळ्यात मंत्रालयातील अनेक बडे अधिकारी सहभागी असल्याचा EDचा संशय : 50 हजार प्रमाणपत्रे तपासणार

राज्यभरातील कार्यरत आणि माजी शिक्षणाधिकाऱ्यांनी बनावट टीईटी प्रमाणपत्रांना मंजुरी दिली. यामुळेच हे शिक्षणाधिकारीही ईडीचे टार्गेटवर आले आहेत. या घोटाळ्यात उमेदवार आणि अधिकारी यांच्यात दुवा म्हणून काम करणारे अनेक दलाल फरार झाले आहेत. याचा शोध घेतला जात असून तुपेंच्या क्लर्कचीही कसून चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.

TET Scam शिक्षक पात्रता चाचणी घोटाळ्यात मंत्रालयातील अनेक बडे अधिकारी सहभागी असल्याचा EDचा संशय : 50 हजार प्रमाणपत्रे तपासणार
mantralaya
Image Credit source: social media
| Updated on: Aug 13, 2022 | 11:09 PM

पुणे : पुणे सायबर पोलिसांनी बाहेर काढलेल्या टीईटी अर्थात शिक्षक पात्रता चाचणी घोटाळ्याचा(Teacher Eligibility Test Scam) तपास ईडीने सुरू केला आहे. या तपासात ईडीची एन्ट्री झाल्याने घोटाळेबाजांचे धाबे दणाणले आहेत. मंत्रालयातील अनेक बडे अधिकारी या घोटाळ्यात सहभागी असल्याचा संशय ईडीला आहे. ईडीने तपासाची व्याप्ती वाढवली असून 50 हजार टीईटी प्रमाणपत्रांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शिक्षणाधिकारी तसेच दलाल ईडीच्या टार्गेटवर आहेत.

राज्यभरातील कार्यरत आणि माजी शिक्षणाधिकाऱ्यांनी बनावट टीईटी प्रमाणपत्रांना मंजुरी दिली. यामुळेच हे शिक्षणाधिकारीही ईडीचे टार्गेटवर आले आहेत. या घोटाळ्यात उमेदवार आणि अधिकारी यांच्यात दुवा म्हणून काम करणारे अनेक दलाल फरार झाले आहेत. याचा शोध घेतला जात असून तुपेंच्या क्लर्कचीही कसून चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.

डी.एड. पास विद्यार्थ्यांनी नोकरी मिळण्याच्या आशेवर टीईटी प्रमाणपत्र घेऊन ठेवली आहेत. 50 हजारांहून अधिकांचे प्रमाणपत्रही तपासली जाणार आहेत. सेवानिवृत्त शिक्षणाधिकाऱ्यांसह मराठवाडा, खानदेश व विदर्भातील अनेक शिक्षणाधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

उत्तरपत्रिकेत बारकोड नसल्याचा फायदा उचलून दलालांमार्फत तयार केलेल्या बनावट प्रमाणपत्रांना मंजुरी देण्यात आली. याला मंजुरी देणाऱ्या शिक्षणाधिकारी, एजंट आणि हेराफेरी करणाऱ्या औरंगाबादच्या झेरॉक्स सेंटर चालक तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेमार्फत शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) गैरव्यवहारात 40 हून अधिक जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.

बारकोड नसल्याचा फायदा

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार टीईटी परीक्षा घोटाळ्यात अनेक शिक्षणाधिकाऱ्यांनी खोडवेकर यांना जाळ्यात ओढल्याचे तपासात समोर आले आहे. हा सर्व प्रकार औरंगाबादच्या नाथ मार्केटमधील झेरॉक्स सेंटरमधून केला जात होता. प्रमाणपत्रावर बारकोड नसल्याने नापास झालेल्यांच्या प्रमाणपत्रावर हेराफेरी करून पास असल्याचे प्रमाणपत्र जारी करण्यात आल्याचेही तपासात समोर आले आहे. परीक्षेत नापास झालेल्या शिक्षकांना पुनर्तपासणीसाठी अर्ज करण्यास सांगून पुणे आणि मंत्रालयातून मंजुरी आणली जात होती. 2014 पासून सुरू असलेल्या या खेळीत अनेक बनावट अ‍ॅप्रुव्हल देण्यात आले आहेत. पोलिसांच्या तपासात ही सर्व हेराफेरी उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

2013 पासून टीईटी घोटाळा उघड होईपर्यंत प्रत्येकवेळी जावक क्रमांक नवीन दाखवून सोयीनुसार नोंद केली आहे. हे सर्व रजिस्टर ताब्यात घेण्याचे काम ईडीकडून सुरू करण्यात आल्याने अधिकार्‍यांसह दलालांचे धाबे दणाणले आहेत. याशिवाय अनेक वर्षांपासून क्लार्क व वरिष्ठ क्लार्क एकाच जागी कसे, याचाही तपास सुरू झाला आहे. सेवेत रुजू झाल्यापासून कोण कोण कर्मचारी याच जागेवर होते, त्यांची यादी तयार केली जात असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळली आहे. ईडीने तपास सुरु केल्यापासून हे प्रकरणाच नव नवीन अपडेट समोर येत आहेत.