गोदावरीत उतराल तर जीवास मुकाल; रामकुंड परिसरात 4 दिवसांत 4 बुडाले

| Updated on: Oct 05, 2021 | 10:25 AM

नाशिकमधल्या रामकुंड परिसरात चार दिवसांत चौघांचा बुडून मृत्यू झाला आहे. गोदावरी नदी ओसंडून वाहत आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्यात उतरून धोका पत्करू नये, असे आवाहन पोलिस आणि प्रशासनाने केले आहे.

गोदावरीत उतराल तर जीवास मुकाल; रामकुंड परिसरात 4 दिवसांत 4 बुडाले
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

नाशिकः नाशिकमधल्या रामकुंड परिसरात चार दिवसांत चौघांचा बुडून मृत्यू झाला आहे. गोदावरी नदी ओसंडून वाहत आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्यात उतरून धोका पत्करू नये, असे आवाहन पोलिस आणि प्रशासनाने केले आहे.

नाशिक जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे गोदावरी नदीला चारदा पूर आला. जिल्ह्यातील सर्व धरणे भरली आहेत. त्यामुळे धरणांवर पोलिस बंदोबस्त तैनात करून या परिसरात नागरिकांना फिरकण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई केली आहे. मात्र, नाशिक शहरातील रामकुंड परिसरात अनेक भाविक दर्शनासाठी येतात. त्यात गेल्या चार दिवसांत पाण्याचा अंदाज न आल्याने आणि पाय घसरून पडल्याने चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पहिली घटना रामकुंडाजवळच्या गांधी तलावात घडली. यात उत्तम नगरमधल्या गणेश कॉलनीतले महाजन कुटुंब देवदर्शनासाठी आले होते. या कुटुंबातील रावसाहेब महाजन (वय 36) यांचा पाय घसरला आणि ते गोदापात्रात कोसळले. त्यांना शोधण्यासाठी जीवरक्षक जवानांनी खूप प्रयत्न केले. मात्र, पाण्याची पातळी जास्त असल्याने त्यांना अपयश आले. खूप उशिराने त्यांचा मृतदेह हाती लागला. रावसाहेब यांच्या मागे पत्नी, मुलगी, आई, वडील, भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे. दुसऱ्या घटनेत पाण्यात पडलेले रावसाहेब महाजन यांचा शोध घेताना जीवरक्षक जवानांना एक मृतदेह आढळला. पोलिसांनी याप्रकरणी तपास केला असता, तो ओवेस नदीम खान या अवघ्या अठरा वर्षांच्या तरुणाचा असल्याचे समजले. तिसऱ्या घटनेत साहील सलीम अन्सारी या अवघ्या बारा वर्षांच्या मुलाचा गोदापात्रात बुडून मृत्यू झाला. तो नाशिकमधल्या बुधवार पेठेत रहायचा. साहील हा घरात कोणालाही न सांगता गोदापात्रावर अंघोळीला गेल्या असल्याचे समजते. त्यात पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याची शक्यता आहे.

धरणे ओसंडून भरली

नाशिकमध्ये महिनाभरापासून जोरदार पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व धरणे ओसंडून भरली आहेत. गंगापूर धरणातून गोदापात्रात पाणी सोडणे सुरू होते. त्यामुळे गोदावरी नदीही ओसंडून वाहत आहे. हे ध्यानात घेता गोदापात्राकडे फिरकू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील अनेक धरणांवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. धरण परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

यापूर्वी तिघे बुडाले

नाशिकमध्ये यापूर्वी पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती. त्यात नांदगावमध्ये पांझण नदीच्या पुलावरून नीलेश परदेशी (वय 31) हा तरुण वाहून गेला आहे. दिंडोरीतील गणेश गुंबाडे (वय 22) या तरुणाचा पालखेडच्या कालव्यात बुडून मृत्यू झाला आहे. शेतातल्या टोमॅटोवर फवारणी केल्यानंतर गणेश अंघोळीसाठी कालव्यात उतरला होता. कालव्यातून बाहेर निघताना लोखंडी रॉडचा धक्का लागल्याने तो पुन्हा कालव्यात पडला आणि त्याचा मृत्यू झाला.

इतर बातम्याः

दसऱ्याचे सोने लुटण्यासाठी नाशिक सराफा सज्ज; शुद्ध चांदीच्या सुबक मूर्ती फक्त 30 ग्रॅमपासून

नाशिकमध्ये महसुली कामकाजाची होणार तपासणी; विभागीय आयुक्तांचे आदेश, अनेकांचे धाबे दणाणले