
भोपाळ : असं कोणतंही गणित नाही की ते इंजीनिअरकडून सुटत नाही. जर एखादा व्यक्ती सॉफ्टवेअर इंजीनिअर असेल तर त्याला व्यवस्थित प्रोग्रामिंग करूनच पुढे जावं लागतं. अनेक प्रोग्राम सेट करावे लागतात. हे प्रोग्राम सेट करण्यासाठी तास न् तास घालवावे लागतात. पण प्रोग्राम पूर्ण केल्याशिवाय ते श्वास घेत नाहीत. असं असलं तरी जगभरातील किचकट प्रोग्राम सोडवणाऱ्या या अभियंत्यांना घरचे प्रोग्राम सोडवता येईलच असं नाही. एका इंजीनिअरच्या बाबतीत असंच घडलंय. त्याला आपल्या घरचा प्रोग्राम काही सेट करता आला नाही. त्याला कारणही तसंच होतं. दोन बायका असल्यामुळे त्याला तारेवरची कसरत करावी लागली. त्यामुळे कुटुंब न्यायालयालाच हस्तक्षेप करावा लागला अन् इंजीनिअरचं घोडं गंगेत न्हालं.
मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर येथील ही घटना आहे. येथील एका 28 वर्षीय तरुणीने येथीलच एका सॉफ्टवेअर इंजीनिअरसोबत विवाह केला होता. हा तरुण हरियाणाच्या गुरुग्राम येथील एका मल्टिनॅशनल कंपनीत इंजीनिअर म्हणून काम करतो. लग्नानंतर दोघेही दोन वर्ष गुरुग्राम येथे राहिले. त्यांना एक मुलगाही झाला.
त्यानंतर मार्च 2020मध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाला. वर्क फ्रॉम होममुळे हा तरुण ग्वाल्हेरला आला. काही दिवस राहिल्यानंतर पुन्हा गुरुग्रामला गेला. पण पत्नी आणि मुलाला त्याने घरीच सोडलं. पण कोरोना संपल्यानंतरही तो पत्नी आणि मुलाला घ्यायला परत आलाच नाही. पतीची वाट पाहून थकल्यानंतर ही महिला थेट गुरुग्रामला आली. इथे आल्यावर मात्र तिला जे समजलं ते पाहून ती थक्क झाली. लॉकडाऊनच्या काळात तिच्या पतीने कंपनीतील दुसऱ्या महिलेसोबत संबंध ठेवले होते. दोघे आधी लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहिले. त्यानंतर त्यांना गुपचूप लग्न केलं. दुसऱ्या पत्नीने एका मुलीला जन्मही दिला.
ही माहिती मिळाल्यानंतर पहिल्या पत्नीने नवऱ्याशी भांडण केलं. त्यानंतर ही महिला परत आपल्या माहेरी आली. त्यानंतर तिने कुटुंबीयांच्या मदतीने कुटुंब न्यायालयात धाव गेतली. आणि या महिलेने पालणपोषणाचा खर्च मागितला. त्याचवेळी या महिलेची भेट कौन्सिलर हरीश दिवाण यांच्याशी झाली. दिवाण यांनी या महिलेला समजावलं. कोर्टात केस दाखल केली तर खटला खूप काळ चालेल. त्यानंतर तुला पालणपोषणासाठी किरकोळ रक्कम मिळेल. एवढ्या तुटपुंज्या रकमेतून तुला मुलाचा खर्च भागवता येणार नाही. तसेच कोर्टाच्या पायऱ्या झिजवण्यात पैसेही खर्च होतील, असं दिवाण यांनी या महिलेला पटवून दिलं.
कोर्टात केस दाखल करण्यापूर्वी दिवाण यांनी या महिलेला तिच्या नवऱ्याशी फोनवरून बोलण्यास सांगितलं. त्याला पत्नीसोबत गुरुग्रामला बोलावून घेतलं. त्यावेळी माझं पहिल्या पत्नीशी पटत नाही. तिचा स्वभाव बरोबर नाही. त्यामुळेच मी दुसऱ्या पत्नीसोबत विवाह केला. मी दुसऱ्या पत्नीला कोणत्याही किंमतीत सोडणार नाही, असं या सॉफ्टवेअर इंजीनिअरने सांगितलं. त्यानंतर दिवाण यांनी या इंजीनिअरलाही समजावलं. कोर्टात खटला गेल्यास तुम्हाला त्रास सहन करावा लागेल. हिंदू विवाह अधिनियमानुसार पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्याशिवाय दुसरं लग्न करता येत नाही. त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. तसेच पहिली पत्नी हुंडा आणि छळाची केसही दाखल करू शकते. एफआयआर दाखल झाला तर कंपनी कामावरूनही काढू शकते, असं त्यांना समजावण्यात आलं.
दिवाण यांचा तर्क ऐकून हा सॉफ्टवेअर इंजीनिअर तडजोड करण्यास तयार झाला. त्यानुसार दोघांमध्ये एक करार झाला. कोर्टाच्या बाहेर दोघांनीही या कराराला संमती दिली. या करारानुसार पतीला आठवड्यातून तीन दिवस पहिल्या पत्नीसोबत, नंतरचे तीन दिवस दुसऱ्या पत्नी सोबत राहावे लागेल. रविवारी त्याच्या मर्जीनुसार तो कुठेही राहू शकतो. म्हणजे रविवारी तो दोघींपैकी एकीसोबत राहू शकतो. हा करार झाल्यानंतर या इंजीनिअरने दोन्ही पत्नींना गुरुग्राममध्ये वेगवेगळे फ्लॅट घेऊन दिले आहेत.