
हैदराबादवरुन कुवैतला जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइटचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. या विमानात मानवी बॉम्ब आहे, असा धमकीचा ई-मेल आला होता. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ कारवाई करत फ्लाइटच मुंबईत इमर्जन्सी लँडिंग करायला लावलं. सुरक्षा यंत्रणा याचा तपास करत आहेत. विमानाला एअरपोर्टच्या आयसोलेश बे मध्ये पाठवलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी इंडिगोच्या फ्लाइटने हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टवरुन कुवैतला जाण्यासाठी उड्डाण केलं. फ्लाइटने उड्डाण केल्यानंतर धमकीचा ई-मेल आला. त्यात विमानात बॉम्ब असल्याची धमकी होती.
त्यानंतर एअर ट्रॅफिक कंट्रोलने ATC तात्काळ विमानाला मुंबईच्या दिशेने वळवलं व इर्मजन्सी लँडिंग करायला लावली. फ्लाइटचं सुरक्षित लँडिंग झालं आहे. सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था केली जात आहे.
आतापर्यंतच्या तपासात काय आढळलय?
अधिकाऱ्यांनी सांगितलं की, लँडिंग नंतर विमानाला आयसोलेशन (वेगळ्या पार्किंग) मध्ये नेण्यात आलं.तिथे बॉम्ब निकामी पथक, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्योरिटी फोर्स (CISF) आणि अन्य सुरक्षा टीम्सनी विमानाची तपासणी सुरु केली आहे. प्रारंभिक रिपोर्ट्सनुसार, आतापर्यंत कुठलीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटकं सापडलेली नाहीत.
याआधी कधी आलेली धमकी?
मागच्या महिन्यात दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ बॉम्बस्फोट झाला होता. या बॉम्ब स्फोटाने देश हादरलेला. त्यानंतर देशातील 5 विमानतळं बाँम्बने उडवून देणार असल्याची धमकी देण्यात आली होती. इंडिगो एअरलाइन्सला देशातील 5 आंतरराष्ट्रीय विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्याबाबत मेल आलेला. या ईमेलमध्ये दिल्ली, मुंबई, चेन्नई, त्रिवेंद्रम आणि हैदराबाद या पाच विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती.